yuva MAharashtra वाटसरूंची तहान भागवणाऱ्या पाणपोई होताहेत दुर्मिळ

वाटसरूंची तहान भागवणाऱ्या पाणपोई होताहेत दुर्मिळ



सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
सांगली - उन्हाच्या झळा सुरू झाल्या की सामाजिक बांधिलकी म्हणून सार्वजनिक ठिकाणी लाल सुती कपड्यात गुंडाळून मातीच्या रांजणात पिण्याचे पाणी भरून मोफत तहान भागविणाऱ्या पाणपोई सध्या लुप्त होत चालल्या आहेत. कुलर, जार, बाटलीबंद पाण्याच्या जमान्यात पाणपोई गायब झाल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वी उन्हाळ्याची चाहूल लागली की, तहानलेल्यांची तहान भागविण्यासाठी सामाजिक कार्याचे भान ठेवत सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोई सुरू करत. यासोबत नातेवाइकांच्या तरी स्मरणार्थ पाणपोईंची भर पडत गेली. त्यापुढील काळात राजकीय मंडळींची स्वतःची जाहिरातरूपी सेवाही पाणपोईने घेतली. सामाजिक कार्यकर्ते, मित्र मंडळे, सामाजिक संस्था, राजकीय मंडळी मात्र, अलीकडच्या काळात पाणपोईतून समाजसेवा विसरत चालल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. काळानुरूप पाण्याचा 'व्यापार' सुरू झाल्याने आणि पाणपोईंची जागा जार व बाटलीबंद पाण्याने घेतल्याने पाणपोई गायब होत गेली आहे.


आता हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच रांजणाची पाणपोईची संख्या उरली आहे. काही वर्षांपूर्वी घराबाहेर पडल्यानंतर कुठे रांजण, माठ त्यावर लाकडी झाकण आणि लाल रंगाचे ओले कापड झाकलेले पाणी पिण्यासाठी रंगीबेरंगी प्लास्टिक ग्लास असलेली पाणपोई असायची. त्या रांजणांमधील नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले पाणी पिले की तहान भागायची. तहानलेल्यांना पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्था, संघटना सामाजिक सेवेचे भान जपत वाटसरूंना प्यायचे पाणी उपलब्ध करून द्यायचे. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची, गरीब कष्टकऱ्यांची अशा पाणपोईने चांगली सोय होत होती. विशेषतः उन्हाळ्यात यावर भर दिला जात असे. कारण तेव्हा जारचे प्लांट, बाटलीबंद पाण्याचा व्यापार फारसा विस्तारित झाला नव्हता. अलीकडे मात्र जारच्या माध्यमातून पाणी विकत व सवलतीच्या दरात घरपोच मिळू लागल्याने पाणपोईची पद्धत मागे पडू लागली आहे, तर पाणपोईचे पाणी मिळणे किंवा पिणे काहींना आता कमीपणा वाटू लागला आहे. एवढेच काय, तर हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी विकत घेऊन पिणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे. परंतु ज्यांना बाटलीबंद पाणी विकत घेणे शक्य नाही. प्रवासात जार नेणे शक्य नाही, अशा गोरगरीब, सामान्यांचे उन्हाळ्यात हाल होतात. त्यामुळे विविध मंडळे दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेऊन पाणपोई पुन्हा सुरू करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ मंडळी कष्टकरी वर्गातून व्यक्त केले जात आहे.