Sangli Samachar

The Janshakti News

+92-xxxxxxxxxx वरून तुम्हाला WhatsApp वर कॉल आलाय ? व्हा सावध!



सांगली समाचार - दि ६ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - दूरसंचार विभागाने (DoT) मोबाईल युझर्ससाठी एक अॅडव्हायझरी जाहीर केली आहे. ॲडव्हायझरीनुसार, दूरसंचार विभागाचं नाव घेऊन ग्राहकांची फसवणूक करणारे कॉल केले जात आहेत. यामध्ये सरकारला, तुमच्या नंबरद्वारे चुकीचं काम केलं जात असल्याचं तपासात आढळून  आल्याचा दावा केला जात आहे.

तसंच अशा परिस्थितीत तुमचा मोबाईल नंबर डिस्कनेक्ट करण्याच्या सूचना दिल्या गेल्या असल्याचंही त्यात सांगण्यात येत असल्याची माहिती समोर आलीये.


या नंबरपासून राहा सावध

दूरसंचार विभागानुसार, या कामासाठी परदेशी मोबाईल नंबर (जसं +92-xxxxxxxxx) वापरले जात आहेत. तसंच व्हॉट्सॲप कॉल्स देखील या क्रमांकांवरून केले जात आहे. सरकारीनं दिलेल्या सल्ल्यानुसार, फसवणूक करणाऱ्या व्यक्ती मोबाईल नंबर ब्लॉक करण्याची धमकी देऊन लोकांची वैयक्तिक माहिती चोरून आर्थिक फसवणूक करत आहेत. दूरसंचार विभागानं आपल्याकडून असे कोणतेही कॉल केले जात नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. तसंच ग्राहकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय.

मेसेज, कॉलपासून राहा सावध

तुम्हाला असा कॉल किंवा मेसेज येत असल्यास, तुम्ही संचार साथी पोर्टलच्या (www.sancharsathi.gov.in) 'आय-रिपोर्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन्स' या फीचरवर त्याची तक्रार करू शकता.
संचार साथीच्या Know Your Mobile Connections या सेवेच्या मदतीनं रजिस्टर्ड मोबाईल कनेक्शन तपासले जाऊ शकतात आणि असे नंबर ब्लॉक केले जाऊ शकतात. बँकिंग फसवणूक झाल्यास, सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर १९२० वर कॉल करून आणि मेसेज करून तक्रार नोंदवता येईल. किंवा तुम्ही www.cybercrime.gov.in वर तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही थेट फोनवरून असे कॉल आणि मेसेज ब्लॉक करू शकता.