yuva MAharashtra भाजपचे हे पाच रणनीतीकार, ज्यांनी इतर पक्षांचे 80 हजार नेते आणि कायकर्ते फोडले

भाजपचे हे पाच रणनीतीकार, ज्यांनी इतर पक्षांचे 80 हजार नेते आणि कायकर्ते फोडले



सांगली समाचार दि. - १ एप्रिल २०२४
मुंबई  - भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी 'अब की बार, 400 पार' अशी घोषणा करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मात्र, लोकसभेचे हे युद्ध सुरु करण्यापूर्वीच भाजपने एक मोठी रणनीती आखली होती. कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक जिंकायची हे धोरण नजरेसमोर ठेवून भाजपने यासाठी पाच नेत्यांवर एक मोठी जबाबदारी सोपविली होती. ही जबाबदारी म्हणजे लोकसभा निवडणुकीपर्यंत विरोधी पक्षाच्या एक लाख नेते आणि कार्यकर्ते यांना भाजपमध्ये आणणे. आतापर्यंत भाजपचे हे लक्ष्य 80 टक्के पूर्ण झाले आहे. भाजपच्या त्या पाच महत्वाच्या रणनीतीकार यांच्यामध्ये महाराष्ट्रातील एका नेत्याचाही समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी ‘अब की बार, 400 पार’चा नारा दिला. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी विरोधी पक्षांची ताकद कमी करावी लागेल आणि आपली ताकद वाढवावी लागेल हे भाजपच्या रणनीतीकार यांना कळून चुकले. निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढायची असते. यासाठी साम, दाम, दंड, भेद या चार सूत्रांचा वापर करावा लागला तरी चालेल असे रणनीतीकारांनी ठरवले. हे सूत्र आत्मसात करत भाजपने विरोधी पक्षांच्या तंबूत एकही मोठा नेता न राहू देण्याची योजना आखली.

लोकसभा निवडणुकीआधीच विरोधी पक्षांची शक्ती असलेल्या नेत्यांना भाजपात आणणे ही ती योजना होती. किमान एक लाख विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याचे लक्ष्य भाजपने केंद्रित केले. इतर पक्षातील नेत्यांना भगवाधारी बनविण्याचे भाजपचे हे लक्ष्य जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत विरोध पक्षांच्या जवळपास 80 हजार लहान मोठे नेते, कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एका लाख हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पक्षाला आता केवळ 20000 ही संख्या गाठायची आहे.

भाजपमध्ये प्रवेश करणारे नेते

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील, माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, माजी मंत्री बसवराज पाटील, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी, केरळचे माजी मुख्यमंत्री के करुणाकरन यांची कन्या काँग्रेस नेत्या पद्मजा वेणुगोपाल, माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेस नेते सुरेश पचौरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी, उत्तरप्रदेश काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष रीटा बहुगुणा जोशी या नेत्यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील विद्यमान आमदार राजेंद्र भंडारी, माजी खासदार नवीन जिंदाल, माजी खासदार गंजेंद्र सिंह राजुखेडी, माजी आमदार संजय शुक्ला, माजी आमदार विशाल पटेल, माजी आमदार अजय कपूर, प्रणीत कौर, लालचंद कटारिया, ज्योती मिर्धा, अर्जुन मोधवाडिया, रवनीत सिंग बिट्टू भोपाळ जिल्हा अध्यक्ष कैलाश मिश्रा (कॉंग्रेस), रितेश पांडे, संगीता आझाद (बहुजन समाज पार्टी), अर्जुन सिंग (टीएमसी), व्ही. वरप्रसाद राव (वायएसआरपीसी), सुशील कुमार रिंकू (आप), शितल अंगूराल यांच्यासह हजारो लहान मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

या पाच नेत्यांकडे होती जबाबदारी

भाजप प्रवेश समितीच्या रचनेनुसार महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रींय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे पश्चिम भारताची जबाबदारी आहे. रविशंकर प्रसाद यांच्याकडे पूर्व भारत, राजीव चंद्रशेखर यांच्याकडे दक्षिण भारत, अनुराग ठाकूर यांना उत्तर भारत आणि भूपेंद्र यादव यांच्याकडे मध्य भारताची जबाबदारी देण्यात आली आहे.