सांगली समाचार - दि ७ एप्रिल २०२४
दुबई - गाडीचा नंबर किंवा मोबाईल नंबर फॅन्सी असावा, वेगळा असावा असं अनेकांना वाटतं. दुचाकीसाठी खास नंबर घेतले जातात. त्यात ठराविक नंबरसाठी मोठी रक्कम मोजली जाते. हौशी आणि श्रीमंत लोक गाडीपेक्षा गाडीच्या नंबरसाठी जास्त पैसे मोजल्याचंही आजपर्यंत अनेकदा दिसून आलंय. पण मोबाईल नंबरसाठी थोडेथोडके नाही तर तब्बल 7 कोटी रुपयांहून अधिक पैसे एका व्यक्तीने मोजले आहेत. द मोस्ट नोबल नंबर्सच्या चॅरिटी ऑक्शनमध्ये एका युनिक नंबरसाठी सव्वा सात कोटी रुपयांची बोली लागली. या नंबरमध्ये 7 वेळा 7 हा आकडा आहे. खलीज टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या नंबरसाठी लिलावात अनेकांनी भाग घेतला. नंबर विकत घेण्यासाठी चढाओढही झाली. शेवटी AED 3,200,000 (भारतीय चलनानुसार 7.25 कोटी रुपये) मोजून हा नंबर विकत घेतला गेला.
संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी सुरु केलेल्या Dh1 बिलियन मदर्स एंडॉमेंट कॅम्पेनला सपोर्ट करण्यासाठी 10 फॅन्सी कार नंबर, 21 एक्सक्लुजिव्ह मोबाईल नंबर्सचा लिलाव केला गेला. यात 7 सिरीजच्या नंबरसाठी सर्वाधिक चढाओढ झाली.
युनिक नंबरसाठी 22 लाख रुपयांपासून बोली सुरू झाली होती. काही सेकंदातच यात इच्छुकांनी चढ्या दराने बोली लावायला सुरुवात केली. लिलावात 058-7777777 या नंबरला ७.२५ कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आलं. याशिवाय 054-5555555 या नंबरसाठीही सहा कोटी रुपयांपर्यंत रक्कम मोजली गेली. चॅरिटी लिलावात एकूण 86 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोळा केली गेली. यात गाड्यांच्या नंबरसाठी एकूण 65 कोटी रुपयांची बोली लागली. तर टेलिकॉम कंपन्यांच्या स्पेशल नंबर्ससाठी 20 कोटी रुपये मोजले गेले. गेल्या वर्षी दुबईतील नंबर प्लेटचा लिलाव चर्चेत आला होता. P7 नंबरसाठी तब्बल 124 कोटी रुपये मोजले गेले होते.