yuva MAharashtra गदग हत्याकांडातील मिरज कनेक्शन; आई-वडिलांच्या खुनासाठी मुलाने दिली होती 65 लाखाची सुपारी !

गदग हत्याकांडातील मिरज कनेक्शन; आई-वडिलांच्या खुनासाठी मुलाने दिली होती 65 लाखाची सुपारी !



| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि.२४ एप्रिल २०२४
कर्नाटकात गदग येथे एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडप्रकरणी सूत्रधारासह आठ जणांना अटक करण्यात आली. यापैकी पाच जण मिरजेतील आहेत. मुलानेच वडील व सावत्र आईला ठार मारण्यासाठी ६५ लाखांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गदग पोलिसांनी मिरजेत पाच संशयितांना ताब्यात घेतले.

विनायक बाकळे हा तरुण या हत्याकांडाचा सूत्रधार आहे. विनायक याने त्याचे वडील प्रकाश बाकळे व सावत्र आई सुनंदा बाकळे यांना ठार मारण्याची सुपारी गदग येथील फिरोज काझी यास दिली होती. यासाठी काझीने तुरुंगात ओळख झालेल्या मिरजेतील टाेळीची मदत घेतली. टाेळीतील पाच जणांसह ताे बाकळे यांच्या घरात शिरला. हल्ल्यात बाकळे यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दाम्पत्याचा व त्यांच्या मुलीचा बळी गेला. विनायक याचा सावत्र भाऊही मारला गेला.


याप्रकरणी फिरोज निसारअहमद काझी (वय २९, रा. राजीव गांधीनगर, गदग), झिशान मेहबूबअली काझी (वय २४, रा. गदग) यांना ताब्यात घेतल्यानंतर मिरजेतील साहील अशफाक काझी (वय १९), सोहेल अशफाक काझी (वय १९), या जुळ्या भावांसह सुलतान जिलानी शेख (वय २३), महेश जगन्नाथ साळोके (वय २१), वाहिद लियाकत बेपारी (वय २१, रा. गुरुवार पेठ, मिरज) यांचा हत्याकांडात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

प्रकाश बाकळे व त्यांचा मुलगा विनायक यांच्यात मालमत्तेवरून वाद होता. विनायक हा प्रकाश यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. विनायकच्या आईच्या मृत्यूनंतर प्रकाश यांनी दुसरे लग्न केले. मुलगा व वडिलांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू हाेता. विनायकने वडिलांना काहीच सांगता मालमत्ता विकल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यामुळे विनायकने आईवडिलांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने फिरोज काझी यास ६५ लाखांची सुपारी दिली. काझीसह मारेकरी बाकळे यांच्या घरात शिरले. त्यांनी बाकळे यांचा दुसरा मुलगा कार्तिक याच्यासह त्याचे लग्न ठरलेली वाग्दत्त वधू व तिच्या आईवडिलांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. 

यावेळी प्रकाश बाकळे व त्यांची पत्नी सुनंदा घरात वरच्या खोलीत झोपले होते. त्यांनी दरवाजाची कडी लावली होती. हल्लेखाेरांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवत दरवाजावर लाथा मारल्या. तोपर्यंत प्रकाश बाकळे यांनी पोलिसांशी संपर्क साधला. यामुळे मारेकऱ्यांनी तेथून पलायन केले. पोलिसांनी अटक केलेले सुलतान शेख, काझी, बेपारी हे मिरजेतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.