Sangli Samachar

The Janshakti News

धार्मिक आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं, 400 हून अधिक जागा का हव्यात हेही सांगितलं !



| सांगली समाचार वृत्त |
सागर - दि.२५ एप्रिल २०२४
आपल्या संविधानानुसार, धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाऊ शकत नाही. मात्र काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात तसे आश्वासन दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर दलित, आदिवासी आणि ओबीसी प्रवर्गाला दिलेले आरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी 400 जागांची गरज आहे, असे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. ते मध्य प्रदेशातील सागर येथे एका प्रचार सभेत बोलत होते.

धर्माच्या आधारावर आरक्षणाचा संकल्प -

मोदी म्हणाले, "आज काँग्रेसचे एक असे सत्य देशासमोर आले आहे, जे ऐकून देशातील प्रत्येक नागरिक अवाक झाला आहे. धर्माच्या आधारावर कुणालाही आरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे आपल्या संविधानात स्पष्टपणे नमूद आहे. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः धर्माच्या आधारावर आरक्षणाच्या विरोधात होते. मात्र, काँग्रेसने काही वर्षांपूर्वी धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प केला होता. ते अपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेलत आहेत."


OBC चा हक्क हिसकावून मुस्लिमांना दिला -

पीएम मोदी म्हणाले, "गेल्या वेळी कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण दिले होते. यासाठी काँग्रेसने मागच्या दाराने आणि बेकायदेशीरपणे चलाखी केली होती. ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा गुन्हा काँग्रेसने केला होता. यासाठी त्यांनी मुस्लिमांच्या सर्व जातींना ओबीसी कोट्यात टाकले आहे. असे करून त्यांनी ओबीसींचे मोठे अधिकार हिरावून घेतले आणि धर्माच्या आधारावर दिले. हाच फॉर्म्युला संपूर्ण देशात लागू करण्याची काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेस OBC प्रवर्गाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्यांनी OBC समाजाचा हक्क हिरावला आहे. काँग्रेसने सामाजिक न्यायाची हत्या केली आहे. संविधानाचा अनादर केला आहे आणि बाबासाहेबांचाही घोर अपमान केला आहे."

का हव्या आहेत 400 हून अधिक जागा ? 


"बंधूंनो, हे मला प्रश्न विचारतात, 400 हून अधिक जागा का? मी उत्तर देतो, आपण राज्यांमध्ये जी चलाखी करत आहात, आपण दलित, आदिवासी आणि ओबीसींचे आरक्षण चोरी करण्याचा लुटण्याचा जो खेळ खेळत आहात, आपला हा खेळ कायमचा बंद करण्यासाठी, आपल्या मनसुब्यांना कायमचे टाळे ठोकण्यासाठी मोदीला 400 हून अधिक जागा हव्या आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.