सांगली समाचार - दि ७ एप्रिल २०२४
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामूला रेल्वे लिंक प्रोजेक्ट अंतर्गत कटरा-बनिहाल विभागात चिनाब नदीवर पूल उभारण्यात आला आहे. हा पूल 359 मीटर उंच आहे. चिनार नदीवरील हा पूल म्हणजे अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे. चिनाबवर उभारण्यात आलेला हा पूल 17 स्पॅन मिळून तयार करण्यात आला आहे. त्याची कमान 467 मीटर लांब आहे. ही कमान सर्वात लांब असल्याचे म्हटले जाते. रेल्वेच्या म्हणण्यानुसार 467 मीटर लांबीच्या कमानीचा स्पॅन जोडणे महत्त्वाचे आहे.
चिनाब नदीवर उभारण्यात येत असलेला हा पूल भूकंप आणि स्फोटक प्रतिरोधक आहे. हा पूल ताशी 266 किलोमीटर वेगाने वाऱ्याला तोंड देऊ शकतो. तसेच भूकंपाचे धक्के सहन करु शकतो. बांधकामात सुमारे 30,350 मेट्रिक टन स्टीलचा वापर आहे. चिनाब नदीवरील या पुलाच्या संरचनात्मक तपशीलांसाठी 'टेकला' सॉफ्टवेअर वापरले आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल स्टील -10 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करू शकतो.
या पुलाच्या निर्मितीसाठी कोकण रेल्वेची मदत घेण्यात आली आहे. उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी मिळून चिनाब पुलाचा आराखडा तयार केला आहे. कोकण रेल्वेला पहाडी भागात पूल निर्मितीचा अनुभव आहे. यामुळे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व रस्ते बांधले. या रस्त्यांमुळे दूरवरच्या गावांना जोडणी मिळाली आहे.