सांगली समाचार - दि ८ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच टप्प्यात सुट्यांनी मांडव घातला आहे. या आठवड्यात सु्ट्यांमुळे बँकांचे कामकाज प्रभावित होईल. या आठवड्यात केवळ 3 दिवस कामकाज होईल. तर उर्वरीत 4 दिवस बँकां बंद असतील.
विविध सण आणि रविवार यामुळे बँकांना सुट्टी असेल. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात, एप्रिल 2024 मध्ये दोन-चार दिवस नाही तर 14 दिवस सुट्या असतील. अर्थात संपूर्ण देशात इतक्या दिवस बँका बंद नसतील. काही भागात या सुट्यांना ब्रेक लागेल. ग्राहकांना अनेक व्यवहार ऑनलाईन, डिजिटलच्या माध्यमातून करता येणार आहे.
या आठवड्यात सुट्यांचा पाडाव
RBI ने सुट्यांची यादी जाहीर केल्याप्रमाणे, हा आठवडा बँकांसाठी सुट्यांचा असेल. अनेक राज्यात या आठवड्यात केवळ तीन दिवसच कामका होईल. याचा अर्थ संबंधित राज्यांत केवळ 3 दिवस बँका उघडतील. या आठवड्यात जास्त करुन बँका बंद असतील. परिणामी बँकेसंबंधी काही व्यवहारांवर परिणाम होईल. ग्राहकांचे काम वेळेवर होण्यात अडचण येऊ शकते. त्यानुसार, ग्राहकांनी नियोजन करणे आवश्यक आहे.
मंगळवारपासून सुट्यांचा हंगाम
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल 2024 मंगळवारपासून बँकांच्या सुट्यांचा हंगाम सुरु होत आहे. मंगळवारी बँकांना गुढी पाडवा, उगाडी, तेलुगू नवीन वर्ष, सजीबु नोगमपानबा (चेइराओबा) आणि प्रथम नवरात्रीची सुट्टी असेल. वेगवेगळ्या राज्यांनुसार, तिथल्या सणासुदीनुसार बँका बंद असतील. मंगळवारी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, मणिपूर, गोवा आणि जम्मू-काश्मिरमधील बँकांच्या शाखांना ताळे असेल. तिथे कामकाज होणार नाही. 10 आणि 11 एप्रिल रोजी ईदची सुट्टी आहे. या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी 10 एप्रिल, बुधवारी रमजान (ईद-उल-फितर) निमित्त केरळमधील बँक बंद असतील. तर 11 एप्रिल रोजी गुरुवारी जवळपास संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल. या दिवशी केवळ चंदीगड, सिक्कीम, केरळ आणि हिमाचल प्रदेशातील बँकांमध्ये कामकाज होईल.
या राज्यात केवळ 3 दिवस काम
13 एप्रिल रोजी महिन्यातील दुसरा शनिवार आहे. त्यामुळे देशातील अनेक बँक बंद असतील. त्यानंतर 14 एप्रिल रोजी रविवार असल्याने त्यादिवशी सुट्टी असेल. या आठवड्यात देशातील 8 राज्यांमध्ये केवळ 3 दिवस कामकाज होईल. तर उर्वरीत 4 दिवस या बँकांचे कामकाज ठप्प असेल. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, मणिपूर, गोवा आणि जम्मू-काश्मीर या राज्यात आठवड्यातील 4 दिवस बँका बंद असतील.
ऑनलाईन बँकिंग सेवा मात्र सुरु
सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.