yuva MAharashtra अमित शहांचा मनमोहन सिंग यांच्यावर गंभीर आरोप

अमित शहांचा मनमोहन सिंग यांच्यावर गंभीर आरोप



सांगली समाचार - दि ३ एप्रिल २०२४
बंगळूर - आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप '४०० पार'चे लक्ष्य गाठणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 'एनडीए'शी इंडिया ब्लॉकची तुलनाच होऊ शकत नाही. इंडिया ब्लॉक हा परिवारवादी आणि भ्रष्टाचारी आहे. मनमोहन सिंगांच्या दहा वर्षांच्या काळात काँग्रेसने १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

बंगळूरमधील पॅलेस ग्राऊंडवर आयोजित मेळाव्यात श्री. शहा बोलत होते. कर्नाटकातील सर्व २८ लोकसभेच्या जागा भाजप जिंकेल, असा विश्वास व्यक्त करून विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप त्यांनी केला. कधीही सुटी न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उन्हाळा सुरू होताच परदेश दौऱ्यावर जाणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना करत, त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीए- आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आहे, ज्यात भ्रष्ट लोकांचा समावेश आहे, जे कौटुंबिक राजकारण चालवतात, असे ते म्हणाले.


पंतप्रधान मोदींनी यावेळी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांसमोर '४०० पार'चे लक्ष्य ठेवले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकच्या जनतेने ४३ टक्के मतदान केले आणि १७ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये ५१ टक्के मते मिळाली आणि २५ जागा मिळाल्या, परंतु यावेळी ६० टक्के मतांची हमी द्या आणि भाजप आघाडीला सर्व २८ जागांवर विजयी करा. काँग्रेसला राज्यात खातेही उघडू दिले जाणार नाही, असे ते म्हणाले.

मोदी जगातील एकमेव व्यक्ती आहेत, जे २३ वर्षे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होते आणि त्यांनी एकही दिवस सुटी घेतली नाही. त्यांनी नेहमीच भारतासाठी काम केले. दुसरीकडे उन्हाळा आला का राहुल गांधी परदेशात जातात. काँग्रेसला दर सहा महिन्यांनी त्यांचा शोध घ्यावा लागतो. संपूर्ण देश नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा, प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, कर्नाटक निवडणूक प्रभारी सरचिटणीस राधामोहन दास अग्रवाल, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यावेळी उपस्थित होते.

मोदींचे झीरो करप्शन

एकीकडे नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून २३ वर्षे काम केले; २३ वर्षांत विरोधकांना मोदींवर २५ पैशांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करता आलेला नाही. ते पारदर्शकतेचे देशात रोल मॉडेल आहेत. दुसरीकडे 'इंडिया' ही भ्रष्टाचाराची आघाडी आहे. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या काँग्रेसच्या १० वर्षांच्या राजवटीत १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे आणि भ्रष्टाचार झाला, असा आरोप शहा यांनी केला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावरही हल्लाबोल करत कर्नाटकच्या जनतेला भ्रष्टाचार आवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी यूपीए सरकारच्या काळात प्रसारमाध्यमांनी नोंदवलेल्या विविध घोटाळ्यांची माहिती त्यांनी दिली.