yuva MAharashtra सायकलची पंक्चर काढणारा तरुण बनला IAS

सायकलची पंक्चर काढणारा तरुण बनला IAS



सांगली समाचार - दि.२३ मार्च २०२४
पालघर - कलेक्टर बनून देशसेवा करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी दरवर्षी लाखो तरुण UPSC ची परीक्षा देतात. मात्र मोजकेच तरुण यात यशस्वी होतात. कारण ही परीक्षा देशातील खूप अवघड असते, मात्र जीवापाड मेहनत करणारे विद्यार्थी ही परीक्षा पास करतात. आज आपण अशाच एका मेहनती अधिकाऱ्याच्या यशाची कहाणी जाणून घेणार आहोत. या अधिकाऱ्याचे नाव वरुण बरनवाल असे आहे. त्यांनी शाळेत असताना खूप संघर्ष केला. त्यांना सायकलची पंक्चरही काढावी लागली. मात्र त्यांनी मेहनत करणे सोडले नाही व UPSC परीक्षा पास होऊन दाखवलं, त्यांचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊयात... 

वरुण बरनवाल हे पालघर जिल्ह्यातील बोईसरचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म सामान्य कुटूंबात झाला. वरुणचे वडील सायकल दुरूस्त करण्याचे काम करायचे. या कामावरच त्यांचे कुटूंबात चालायचे. वरुणच्या वडिलांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत घेतली. मात्र 2006 मध्ये वरुण यांचा वडिलांचे निधन झाले. 

वडिलांच्या निधनानंतर कुटुंब सांभाळायची जबाबदारी वरुण यांच्यावर आली कारण ते घरातील सर्वात मोठे होते. वडिलांच्या निधनानंतर वरुणने सायकलचे दुकान सांभाळायला सुरुवात केली, ते सायकलची पंक्चर काढायचे तसेच सायकल दुरुस्त करायचे. यावर त्यांचे घर चालायचे. याच काळात वरुण यांनी दहावीच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. त्यावेळी वरुण यांच्या आईने त्यांना दुकानापासून दूर केले आणि त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायला लावले. 


वरुण यांनी पुढील शिक्षण सुरु केले तेव्हा त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी त्यांच्या वडिलांवर उपचार करणारे डॉ. कंपली यांनी वरुणला कॉलेजची फी भरायला आर्थिक मदत केली. त्यांना डॉक्टर व्हायचे होते मात्र फी जास्त अल्याने त्यांनी इंजिनीअरिंगची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

वरुण यांनी पुण्याच्या MIT कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांनी इंजिनीअरिंग पूर्ण केले. या काळात वरुण यांना त्यांच्या मित्रांनीही खूप मदत केली. इंजिनीअरिंगनंतर त्यांना एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी लागली. मात्र त्यांनी काही दिवसांनी ही नोकरी सोडली व UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. 

UPSC ची तयारी करत असताना त्यांना काही संस्थांनी पुस्तके पुरवली. त्यांनी जीवापाड मेहनत घेतली व 2016 ची UPSC परीक्षा पास केली. त्यांनी या परीक्षेत 32 वी रँक मिळाली, तसेच ते महाराष्ट्रात तिसरे आले. त्यांना गुजरात कॅडर मिळाले. त्यांनी आतपर्यंत गुजरातमधील विविध जिल्ह्यांमध्ये आपली सेवा दिली आहे. त्यांचा प्रवास हा तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे.