सांगली समाचार - दि.२१ मार्च २०२४
नवी दिल्ली - अबकारी धोरण प्रकरणी मुख्यमंत्री आणि 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी समन्स विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचलनालयाकडे (ईडी) प्रतिसाद मागितला आहे. यासंदर्भात दिल्लीच्या मंत्री आणि ‘आप’ नेत्या आतिशी यांनी एएनआयला सविस्तर माहिती दिली. ‘सक्तवसुली संचालनालय (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वारंवार समन्स पाठवत आहे. या समन्सला आव्हान देण्यासाठी आणि ते कायदेशीर की बेकायदेशीर आहेत, यासाठी त्यांनी (अरविंद केजरीवाल) दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने या याचिकेला विरोध करत उच्च न्यायालयाला ती फेटाळण्याची विनंती केली आहे’, असं आतिशी यांनी सांगितलं.
पुढे त्या म्हणाल्या की, ‘असं असताना न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच ईडीला नोटीसही पाठवली आहे. आता तपास यंत्रणेला न्यायालयात उत्तर द्यायचं आहे. हे समन्स कायदेशीर आहेत की बेकायदेशीर, ते न्यायालय ठरवेल… हे प्रकरण दिल्ली राऊस ॲव्हेन्यू कोर्ट आणि हायकोर्टात विचाराधीन आहे’. ‘आप’च्या या खेळीनं ईडीच अडचणीत आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. आता ईडी न्यायालयाला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्षं लागलं आहे.