सांगली समाचार - दि. १७ मार्च २०२४
सांगली - डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सांगली लोकसभेच्या रिंगणात असणे आणि नसणे, अशा दोन्ही लढतींचा काय परिणाम होईल, यावर राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे. याला कारण जशी त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल किंवा नाही, याबाबतचा संभ्रम कारणीभूत आहे, तशीच गतवेळी गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली तीन लाख मते घेऊन निकालाची समीकरणेच बदलून टाकली होती.
अवघ्या चार-सहा महिन्यांत जिल्ह्याच्या लोकसभेच्या मैदानात चर्चेत यायची चंद्रहार पाटील यांची कामगिरी नक्कीच उजवी आहे. आधी 'वंचित'मधून आणि नंतर शिवसेनेत प्रवेश करीत महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी ते दार ठोठावत आहेत. आघाडीत ही जागा आपल्याकडेच ठेवण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा आणि राज्यस्तरीय नेते कंबर कसून कामाला लागले आहेत. त्याचवेळी 'मातोश्री'वरील पक्षप्रवेशानंतर चंद्रहार यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत त्यांनी धुरळा उडवून दिला आहे.
एकूणच, ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर काय आणि नसतील तर ते अपक्ष लढतील काय, अशा प्रश्नांची उत्तरे आतापासूनच शोधली जाऊ लागली आहेत. ते शिवसेनेचे उमेदवार असतील तर त्यांना स्वतःच्या बळावर ही निवडणूक पेलावी लागेल. कारण सर्व विधानसभा मतदारसंघांत सेनेची ताकद शे-दोनशे कार्यकर्त्यांसह आंदोलने करण्यापलीकडे नाही. सेनेचे हे दुखणं जुनंच आहे. भाजप-सेना युतीपासून इथे गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून काँग्रेस-राष्ट्रवादीतून नेते आयात करीत भाजपचे बस्तान बसवले आहे. संभाजी पवार यांच्या रुपाने सांगलीत भाजपला भक्कम आधार मिळाला. याउलट तेव्हाच्या शिवसेनेने सांगली जिल्ह्याकडे कायम दुर्लक्षच केले.
राजकीय अवकाशामध्ये शिवसेनेची उमेदवारी घेत अनिल बाबर यांनी सेनेचा आमदार करून दाखवला. मात्र उसनवारी आता पक्षाच्या फुटीनंतर संपली. तेव्हा लोकसभेची उमेदवारी पटकावली तरी चंद्रहार यांच्यासमोर अनेक आव्हानांचा डोंगर कायम असेल. कारण त्यानंतर गलितगात्र झालेली काँग्रेस आणखी 'बॅकफूट'वर गेल्याने ती त्यांच्या प्रचारात सक्रिय असण्याची शक्यता कमी आहे, हे त्या पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. काँग्रेसने ही जागा खेचण्यात यश मिळवले तर लांग बांधून जोर, ऊठाबशा काढून शड्डू ठोकून तयार असलेले 'महाराष्ट्र केसरी' मैदान सोडतील, असा तो प्रश्न आहे.
बंडखोरी करीत अपक्ष म्हणून लढण्याचा पहिला पर्याय असेल. त्यातही 'वंचित'चे आघाडीशी जुळले नाही, ते पुन्हा ॲड. आंबेडकरांच्या दारात जाऊ शकतात. अपक्ष म्हणून ते किती मते घेतात, यावरही त्यांचे भविष्यातील उपद्रवमूल्य ठरणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून चांगले मताधिक्य घेतले, तर त्यांच्यासाठी ते मैदान नक्की खुले होऊ शकते. अर्थात, त्यांना राजकारणात पहिले पाऊल टाकण्यासाठी ज्या अनिल बाबर यांनी मदत केली, त्यांच्या वारसांसमोरच त्यांना उभे ठाकावे लागेल.
कारण, सुहास बाबर महायुतीचे उमेदवार असतील. त्याचवेळी या जागेवर महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेनेचा सर्वांत मोठा दावा असेल. तो गायब करण्यासाठी बाबर आणि शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतलेले माजी आमदार सदाशिवराव आणि त्यांचे चिरंजीव विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील ताकदीने प्रयत्न करतील. चंद्रहार यांना टाळून ही मंडळी आपली ताकद संजयकाका की विशाल पाटील यांपैकी कोणाच्या बाजूला उभी करतील, याबद्दल आत्ताच भाष्य करणे घाईचे ठरेल.
तारक की मारक ?
गतवेळी गोपीचंद पडळकर या लढतीत तिसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या वंचित उमेदवाराचा अधिकचा फटका संजयकाका की विशाल यांना बसला, याबद्दल वेगवेगळी मते आहेत. एक निश्चित की दलित, मुस्लिम आणि धनगर मतांचा मोठा वाटा पडळकर यांच्या तीन लाखांच्या बेजमीत होता. हे मतदार भाजपचे की भाजप विरोधकांचे, यावर मत निश्चित करता येईल. आता चंद्रहारच्या बाबतीतही जातीय, स्वतःचा परिसर अशी बेरीज-वजाबाकी करून अशी तारक-मारक समीकरणे लढवली जात आहेत. त्याबाबतही यथावकाश चित्र स्पष्ट होईल.