सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
मुंबई - प्रत्येक मोठ्या शहारामध्ये एक मैदान असतच. त्या शहराच्या ती केवळ क्रीडा क्षेत्रासाठीची ओळख नसते तर त्याचे सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीयही महत्त्वही असते. त्यामुळेच निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची अशा मैदानांवरील प्रचार सभांना होणारी गर्दी ही त्या निवडणुकीवे ‘वारे’ कोणत्या दिशेने वाहत आहे हे अप्रत्यक्षपणे सांगते. आता लोकसभेच्या रणधुमाळीत देशातील शेकडो मैदान अशा गर्दी अनुभवतील. दिग्गज नेते आपल्या प्रचार सभा गाजवतील;पण खरंच प्रचार सभांना हाेणारी गर्दी ही मतदारसंघातील उमेदवाराच्या विजयाची हमी देते का? या प्रश्नाचे उत्तर मागील काही निवडणुकांमध्ये नकारार्थीच असल्याचे दिसून देते.
जाहीर सभांना होणारी ‘गर्दी’ विजयाची हमी ठरत नाही
आपल्याकडे निवडणुका आणि जाहीर सभा याला होणार गर्दी, हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. फार नाही तर मागील दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी नावाचे झंझावात भारतीय राजकारणाने अनुभवला. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या जाहीर सभांना होणारी गर्दी हा राष्ट्रीय पातळीवरील चर्चेचा विषय ठरला हाेता.. या सभांना होणार्या उच्चांकी गर्दीने निवडणूक निकालापूर्वीच विजय कोणाचा होणार हे सांगितले होते. भाजपला बहुमतापेक्षा किती अधिक जागा मिळणार, याची औपचारिक घाेषणा बाकी होती. अपेक्षेप्रमाणे निवडणूक निकालातही भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. मात्र यानंतर पुढील म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत ज्या मतदारसंघांमध्ये मोदींनी सभा घेतली तेथे भाजपचा उमेदवार विजयी झालाच असे नाही. त्यामुळे प्रचार सभांना होणार गर्दीचे म्हणजे विजयाची हमी ठरते, असे मानणे चुकीचे ठरले.. कारण प्रचाराच्या गर्दीचे रुपांतर मतात होणे ही एक दीर्घकालीन प्रकिया आहे. यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात.
प्रचार सभांना जमलेली आणि जमवलेली गर्दी
आपल्या देशातील लोकसंख्येचा विचार करता गर्दी जमवणे, हे फार कठीण काम नाही, असेच सारे म्हणतील;पण राजकीय सभांना गर्दी जमवणे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. गर्दीचे व्यवस्थापन ही एक कला आहे. आपल्या देशात प्रचार सभांना गर्दी जमवणे हे संबंधित नेते आणि कार्यकर्ते यांचे ‘कौशल्य’ मानले जाते. राष्ट्रीय पक्षांच्या ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांच्या सभांना होणारी गर्दी ही उत्सफूर्त असते. या सभांना हजेरी लावणारा मतदार हा प्रेक्षकांच्या भूमिकेतही असू शकतो. राजकीय सभांना उत्सव मानत दिग्गज नेत्यांच्या भाषणाचा आनंद घेण्यासाठीही गर्दी होताना दिसते.
गर्दीबराेबरच ‘हे’ घटक ठरतात महत्त्वाचे
राजकीय सभांना गर्दी होत आहे, याचा अर्थ उमेदवार निवडणूक जिंकेलच असा होत नाही. कारण निवडणूक जिंकण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. यामध्ये राजकीय पक्षाबरोबच स्थानिक कार्यकर्त्यांचे जाळे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी, पक्षाचे सर्वोच्च नेत्याची प्रतिमा, मतदारसंघातील उमेदवाराचा प्रभाव, जात आणि समुदायाचे राजकारण, त्याचबरोबर तत्कालिन राजकीय वारे कोणत्या दिशेला वाहतय याचा मतदार विचार करतात. म्हणूनच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील सर्वात सूजाण मतदार, अशी भारतीय नागरिकांची जगभरात ख्याती आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये दिग्गज नेत्यांच्या सभांना होणारी गर्दी हा दुय्यम घटक ठरतो. महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या सभा गर्दीचा उच्चांक करतात मात्र त्याचे मतात रुपांतर होत नाही, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील १५ वर्षांपेक्षा अधिक काळ अनुभवत आहे.
बदलती संवाद माध्यम
स्वातंत्र्यानंतरच्या काळात सनेत्यांची प्रतिमा आणि प्रभाव ही प्रमुख राजकीय पक्षांचे मुख्य भांडवल होते. संवादाची साधणेही मोजकीच होती. रेडिओवरुन विशेष दिनी राष्ट्रीय नेत्यांची भाषण ऐकण्याची संधी मिळायची. त्यामुळे त्याकाळातील जाहीर सभांना होणारी गर्दी हा सातत्याने गर्दीचा नवा उच्च्चांक करत असे. रेडिओनंतर टीव्हीमुळे घरोघरात राजकीय नेते पोहचले. राजकीय नेते सेलिब्रिटीच झाले. यानंतर आलेल्या सोशल मीडियामुळे झालेल्या संवाद क्रांतीमुळे राजकीय पक्ष आणि नेते या दोघांनाही आपल्या मतदारांशी थेट संवाद साधणे अत्यंत सोपे झाले.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर केला. तसेच विरोधी पक्षांना ‘नाकर्ते’ ठरविण्यातही भाजप यशस्वी ठरला. यानंतर मागील दहा वर्षांमध्ये सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांना सोशल मीडियाचे महत्त्व कळाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यामून मतदार थेट आपल्या पसंतीच्या राजकीय पक्ष आणि नेत्यांना फॉलो करत असल्याने प्रचाराचे काम अधिक सोपे झाले आहे. त्यामुळेच आज राजकीय सभांना होणार्या गर्दीचा मतदारसंघातील उमेदवाराच्या लोकप्रियतेला किंवा त्याच्या मतदान वाढीला फायदा होतो का, या प्रश्नाचे उत्तर शोधणे राजकीय पक्षांसमोरील आव्हान आहे.
मतदारांना त्यांच्या नेत्यांशी थेट ट्विटर आणि फेसबुकवर आणि प्लॅटफॉर्मवर थेट संवादात्मक व्हिडिओंद्वारे संवाद साधता येतो. तंत्रज्ञानामुळे मतदारांना थेट देशातील सर्वोच्च नेत्यांपर्यंत पोहोचता आले आहे. आज तरुणापासून ज्येष्ठांपर्यंत सारेच स्मार्टफोनचा वापर करतात. त्यामुळे व्हॉट्सॲप, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मद्वारे मतदारांशी थेट संवाद साधण्याची सोय आहे. पूर्वीच्या लोकांनी आपल्या नेत्याला थेट ऐकायला मिळेल या आशेने सर्व अस्वस्थता सहन केली, परंतु आता राजकारणी अनेक व्यासपीठांवर बोलत असल्याने रॅलीतील भाषणात कोणतीही नवीनता उरलेली नाही. सोशल मीडियामुळे जाहीर सभांचे आकर्षण कमी झाले हेही एक वास्तव आहे. त्यामुळे गर्दीचे गणित आता निवडणूक जिंकण्याची हमी ठरत नाही.
सोशल मीडियाबरोबर अन्य माध्यमांमुळे मतदारांपर्यंत पोहचणे अधिक सोपे झाले असले तरी निवडणुका आणि जाहीर सभा हे समीकरण आजही पक्के आहे. आजही विविध राजकीय पक्षांच्या जाहीर सभांना होणार गर्दी एक उत्सवाचे रुप धारण करते. राजकीय शक्तीप्रदर्शन हा गर्दी जमविण्या मागील हेतू असतो;पण प्रचार सभांना होणारी गर्दी म्हणजे निवडणूक जिंकण्याची हमी नव्हे याचे अलिकडेचे उदहारण म्हणजे २०२० दिल्ली विधासभा निवडणुका होय. कारण दिल्ली विधानसभा निवडणुकीपूवी ९ महिने आधी भाजपने दिल्लीत सर्व सात लोकसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचारात भाजपने प्रचंड शक्ती पणाला लावली. संपूर्ण दिल्ली भाजपमय झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षातील दिग्गज नेते प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागी झाले. दिल्लीतील भाजपच्या प्रचाराची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली होती. तरीही भाजपचा पराभव झाला. कारण अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीत मूलभूत सुविधांवर दिलेले लक्ष हे आपला पुन्हा एकदा सत्ताधीश करुन गेले;मग भाजपच्या प्रचार सभांना गर्दीचे मतात रूपांतर झालं का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आले. असेच काहीसे २०१५ बिहार विधानसभेतही झाले होते. भाजपविरोधात त्यावेळी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि संयुक्त जनता दल या महाआघाडीने बाजी मारली होती. २०२० विधानसभा निवडणुकीतही बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमारांच्या सभेपेक्षा राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे सुपूत्र तेजस्वी यादव यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती. मात्र स्पष्ट बहुमतापासून लालूप्रसाद यादव पुन्हा एकदा वंचित राहिले.
त्यामुळे जाहीर सभांना होणारी गर्दी म्हणजे मतदारसंघातील उमेदवाराच्या विजयाची हमी, हे समीकरण मागील दोन दशकांमध्ये बदलले आहे. मतदार आज ‘प्रेक्षक’ म्हणूनही सभांना गर्दी करतात. त्यामुळेच एखाद्या नेत्याच्या सभेला गर्दी जमवली होती की, उत्स्फूर्तपणे गर्दी झाली होती, याचे उत्तर निवडणूक निकालानंतरच मिळते. कारण उत्स्फूर्तपणे झालेल्या गर्दीचे रूपांतर मतात झालेले असते. तोपर्यंत गर्दीच्या मनात नेमकं काय चाललंय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न विविध मार्गाने केला जातो. एवढं नक्की की जाहीर सभांना होणारी गर्दी ही विजयाची हमी नसते तर ती केवळ उमेदवाराच्या चर्चेची हमी ठरते.