Sangli Samachar

The Janshakti News

अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान? जाहिरात वादात!



सांगली समाचार - दि. २४ मार्च २०२४
बारामती - सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेकडून जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आली आहे. मात्र, या जाहिरातीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाडांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देताना अजित पवार गटाकडून न्यायालयाचा अवमान झाल्याचे म्हटले आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या...

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी हे निवडणूक चिन्ह वापरण्यास परवानगी दिली, तर घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देताना काही निर्देश दिले आहेत.

अजित पवार गटाची जाहिरात

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जाहिरात वर्तमानपत्रात दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, भारत निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह दिले आहे. हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आहे आणि अंतिम निकालाच्या अधीन राहून, माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे."


जितेंद्र आव्हाडांचे म्हणणे काय?

आव्हाड यांनी अजित पवार गटाची जाहिरात पोस्ट केली आहे. ते म्हणतात, "अजित पवार गटाने दिलेली ही जाहिरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना अतिशय स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आज्ञाभंग असून, न्यायालयाचा अवमान आहे", असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय दिले आहेत निर्देश?

कोर्टाने सुनावणीअंती असे निर्देश दिले होते की, "आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी 'घड्याळ' चिन्हाचा वापर हा न्यायप्रविष्ट आहे आणि अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटाने दिलेल्या आव्हानाच्या निकालाच्या अधीन आहे." असे निवेदन मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करावे, त्याचबरोबर प्रत्येक जाहिरातीत, पत्रकामध्ये, ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपमध्ये हे निवदेन असावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे. पण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीवर आता शरद पवार गटाने आक्षेप घेतला आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनीही या जाहिरातीवरून अजित पवारांच्या पक्षावर टीका केली आहे. त्यांनी जाहिरात पोस्ट करत करत म्हटले आहे की, "या निवेदनातील पहिलं वाक्य खरं असलं तरी लाल चौकटीतील अर्ध वाक्य अधिक सत्य आहे. कारण अंतिम निकालात न्यायालयाने परवानगी दिली तरच घड्याळ चिन्ह पुढे वापरता येईल, अन्यथा घड्याळ तर जाईलच पण वेळ कशी येईल याचा अंदाज लोकांचा विरोध बघता आजच येतोय." 

"राजकारणाला अशा अटी लागू होत असतील तर याचं दुःख वाटतं पण विचार बदलल्यामुळे आणि ज्याचं राजकारणच विरोधी पक्षाला संपवण्याच्या अटीवर चालतं त्यांच्यासोबत गेल्याने ही वेळ आली, हे नाकारता येणार नाही", असेही रोहित पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पुढच्या सुनावणी सर्वोच्च न्यायालयात काय होणार हे बघावे लागेल.