Sangli Samachar

The Janshakti News

मृत व्यक्तींना जिवंत ठेवण्याचा अट्टाहास नको.. 'डेडबॉट्स' ठरतायत मोठा धोका; तज्ज्ञांनी दिला इशारा!



सांगली समाचार - दि. १९ मार्च २०२४
मुंबई  - आपली जवळची व्यक्ती, कुटुंबातील नातेवाईक कायमचं निघून जाणं हे कुणालाही चुकलेलं नाही. यातून सावरण्यासाठी कित्येकांना बराच वेळ लागतो. मात्र, जर तुमच्या जवळच्या व्यक्तींना कधी कायमचा निरोप द्यावाच लागला नाही तर? एआयच्या मदतीने आता हे शक्य झालं आहे. आपल्या प्रियजनांना व्हर्चुअली जिवंत ठेवण्याचा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

एआय आणि डीपफेकच्या मदतीने कुठल्याही व्यक्तीचा खोटा व्हिडिओ तयार केला जाऊ शकतो हे आपल्याला माहितीच आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करुन सध्या 'एआय घोस्ट' किंवा डेडबॉट्स तयार केले जात आहेत. यामध्ये एखाद्या मृत व्यक्तीचा होलोग्राम तयार केला जातो. त्या व्यक्तीचा रेकॉर्डेड आवाज, त्याच्या आवडी निवडी, फोटो-व्हिडिओ या सर्व गोष्टी एआयला पुरवल्या जातात. या मदतीने अगदी ती व्यक्ती जिवंत असताना जशी दिसेल वा बोलेल तसंच हा होलोग्राम तुमच्याशी गप्पा मारतो.

गेलेल्या व्यक्तीची जेवढी जास्त माहिती तुम्ही देऊ शकाल, तेवढा प्रभावी चॅटबॉट तयार होईल. तसं तर गेलेल्या व्यक्तीसोबत पुन्हा एकदा संवाद साधण्याची ही संधी आकर्षक वाटू शकते. मात्र, असं करणं हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी आजिबात चांगलं नसल्याचं मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तात्पुरत्या स्वरुपात, 'मूव्ह ऑन' होण्यासाठी एआयची मदत घेणं गैर नाही. मात्र, हेच डेडबॉट्स तुम्हाला मूव्ह होऊच देत नसतील तर?


एआय घोस्ट ठरू शकतात धोका

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे सध्याचं सगळ्यात लेटेस्ट तंत्रज्ञान असलं, तरी ते अजूनही बेबी स्टेजमध्ये आहे. एआय देखील कित्येक प्रकारच्या चुका करत आहे. काही दिवसांपूर्वीच जेमिनी आणि कोपायलेटच्या फोटो जनरेटिव्ह टूल्समध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. शिवाय, कितीतरी ह्यूमॅनॉईड रोबोट्स मुलाखत देताना आक्षेपार्ह वक्तव्य करताना आढळतात.

एआय गर्लफ्रेंडचं ऐकून चक्क ब्रिटनच्या राणीची हत्या करायला गेला शीख तरुण; झाली नऊ वर्षांची शिक्षा
हाच धोका डेडबॉट्स सोबतही होऊ शकतो. मृत व्यक्तीसोबत बोलताना त्या व्यक्तीने काही वाईट गोष्ट बोलल्यास, किंवा मग चुकीचा सल्ला दिल्यास त्याचा परिणाम जिवंत व्यक्तींवर होणार आहे. एखाद्याच्या निधनातून सावरणारी व्यक्ती आधीच मानसिक रित्या व्हल्नरेबल असते. यात एआयने काही चुकीचं सांगितल्यास त्याचा गंभीर परिणाम दिसू शकतो.

विसरुन जाणंही हेल्दी

डबलिन युनिवर्सिटीमधील मानसोपचार तज्ज्ञ निगेल मुलिगन यांनी याबाबत संशोधन केलं आहे. डेडबॉट्सच्या मदतीने एखाद्या व्यक्तीला डिजिटली जिवंत ठेवणं हे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. उलट अशा प्रकारे मागे राहिलेल्या व्यक्ती मानसिकरित्या अधिकच कमकुवत होत जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं. एखाद्या व्यक्तीला तुमच्या आठवणीत ठेवण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करणं गैर नाही. पत्रं, फोटोंच्या जमान्यानंतर क्लाउड स्टोरेज, व्हिडिओ टेप या माध्यमातून आठवणी जपून ठेवण्याचा जमाना होता. हेदेखील मागे पडून आता एआयचा वापर केला जात आहे. मात्र, या सगळ्यात मूव्ह ऑन न होता येण्याचा धोका आहे.

तज्ज्ञ म्हणतात, की मूव्ह ऑन होण्यासाठी विसरणं महत्त्वाचं आहे. गेलेल्या व्यक्तीला आठवणीत ठेवण्याचे आणखी हेल्दी पर्याय शोधणंही शक्य आहे. वर्षश्राद्ध किंवा त्या व्यक्तीचा जन्मदिन अशा वेळी छोटेखानी कार्यक्रम ठेऊन किंवा अगदी घरीच त्या व्यक्तीच्या आवडीची गोष्ट करून तुम्ही त्या व्यक्तीला आठवणीत ठेऊ शकता.