Sangli Samachar

The Janshakti News

पक्षाचं नवं नाव मिळालं, तुतारी चिन्हही, पण शरद पवारांच्या पक्षाचा नवा झेंडा पाहिला का?


सांगली समाचार- दि. १ मार्च २०२४

मुंबई  - निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला द्यायचा निर्णय दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार गटाला नवीन नाव आणि पक्षचिन्ह मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव पक्षाला मिळालं, तर तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आलं. पक्षचिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांसह रायगडावर गेले. रायगडावरून नव्या पक्षचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. चिन्हाच्या अनावरणानंतर आता पक्षाने नवीन झेंडाही लॉन्च केला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हातात हा नवीन झेंडा, मफलर आणि टोपी घेऊन फोटो काढला आहे.

मागच्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. एवढच नाही तर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा केला. यानंतर ही लढाई निवडणूक आयोगात पोहोचली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवारांचा असल्याचा निकाल दिला. दुसरीकडे अजित पवारांनी आपल्याला 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरही याप्रकरणाची सुनावणी झाली. तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष अजित पवारांचाच असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला.