सांगली समाचार - दि. ३१ मार्च २०२४
नवी दिल्ली - मोदी सरकारनं केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती नागरत्न यांनी एक खळबळजनक भाष्य केलं आहे. नोटाबंदी हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळं आता वेगळीच चर्चा सुरु आहे.
एका खटल्यावर सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नागरत्न यांनी म्हटलं की, नोटाबंदीच्या आदल्यादिवशी नव्या चलनाची चर्चा सुरु झाली आणि दुसऱ्या दिवशी नोटाबंदी झाली. जर भारताला कागदी चलनाकडून प्लॅस्टिक मनीकडं जायचं होतं तर त्यासाठी निश्चितच नोटाबंदी हा पर्याय नव्हता. त्यामुळं ज्या पद्धतीनं नोटाबंदी करण्यात आली ते योग्य नव्हतं. ही कायदेशीर निर्णय प्रक्रिया नव्हती. ज्या घाईमध्ये हे केलं गेलं ते योग्य नव्हतं. कारण काही लोक म्हणतात की तत्कालीन अर्थमंत्र्यांनाही या निर्णयाची माहिती नव्हती. त्यामुळं काळ्या पैशाचं पांढऱ्या पैशात रूपांतर करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, असं मला वाटतं. त्यानंतर इन्कम टॅक्स विभागाच्या कार्यवाहीचं काय झालं, आम्हाला माहिती नाही. त्यामुळं, सामान्य माणसाला झालेल्या त्रासामुळं मला खऱ्या अर्थानं अस्वस्थ वाटलं आणि म्हणून मी विवेक नारायण शर्मा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात असहमती दर्शवली अशी भूमिकाही यावेळी न्या. नागरत्न यांनी मांडली.