Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीच्या उमेदवारी तिढ्यामागील खरे व्हिलन संजय राऊतच



सांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
मुंबई - सध्या सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून जो तिढा निर्माण झालेला आहे, संजय राऊत हेच असल्याचे पुढे येत आहे. उद्धव ठाकरे यांना शब्दजंजाळात अडकून जाहीर सभेत पै. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करायला भाग पाडले. मुंबईत मातोश्री बंगल्यावर उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या हाती 'शिवबंधन' बांधले आणि त्यांना उमेदवारीचे 'संकेत' दिले. महाविकास आघाडीच्या वाटाघाटी सुरू असताना संकेतापर्यंत ठीक होते, मात्र काल मिरजेत त्यांनी 'मी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतोय,' असे सांगत जागा वाटपाआधी पुढचे पाऊल उचलले. तेच आता महाविकास आघाडीच्या वादाचा मुद्दा बनला आहे.

ठाकरे यांनी चंद्रहार यांच्या नावाची मिरजेत घोषणा करावी, अशी आग्रही भूमिका खासदार संजय राऊत आणि स्वतः चंद्रहार पाटील यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी या दोघांनीही व्यासपीठावर 'शब्दजाल' विणला आणि ठाकरेंना घोषणा करावी लागली. त्याआधी सकाळी मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती.


त्यात राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात 'सांगली'वरून शाब्दिक चकमक उडाली होती. सांगलीचा मुद्दा इतका ताणला गेलेला असताना शिवसेना आणि विशेषतः ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यावरून राज्यातील महाविकास आघाडीच्या राजकारणात ठिणग्या उडाल्या आहेत. राऊतांना आज सारवासारव करावी लागली आहे.

मिरजेत शिवसेनेच्या 'जनसंवाद' मेळाव्यात खासदार राऊत आणि चंद्रहार यांनी ठाकरे यांच्या भोवती शब्दजाल विणला. गेला संपूर्ण आठवडा 'सांगली'च्या उमेदवारीवर चर्चा होत असताना 'ठाकरेंनी दिलेला शब्द' हे वाक्य सातत्याने चर्चेत राहिले आहे. काल राऊत म्हणाले, ''चंद्रहार यांना दिल्ली पाठवण्याचा निर्धार तुम्ही केला आहे. मातोश्री निवासस्थानी शब्दाला किंमत असते. तेथे दिलेला शब्द मोडला की काय महाभारत होते, हे २०१९ साली महाराष्ट्राने पाहिले आहे. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना शब्द दिला होता, मात्र तो पाळला नाही. त्याचे परिणाम सगळ्यांनी पाहिले.''

चंद्रहार पाटील यांनी अधिक स्पष्टपणे 'शब्द'फोड केली. ते म्हणाले,''मला लोक विचारतात, तू शिवसेनेत घाईघाईत प्रवेश केलास, मात्र तुझी उमेदवारी निश्‍चित आहे का? उद्धव ठाकरे यांनी शब्द दिलाय, पण कुणी मध्यस्थी होते का? मी त्यांना सांगतो, मला शब्द दिला गेलाय तो मातोश्री निवासस्थानी. मातोश्री मंदिर हेच मध्यस्थ. तेथे दिला गेलेला शब्द मोडला जात नाही.

उद्धवसाहेब, तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाला, पैलवानाला उमेदवारी जाहीर केली. तो शेतकरी व पैलवानांचा सन्मान आहे.'' ही खेळी कामी आली. ठाकरे यांना उमेदवारीची घोषणा करावी लागली. आता पैलवानांची नौका तडीपार लावण्याची जबाबदारी शिवसेनेला पेलवावी लागेल.

कोंडी होणार

उद्धव ठाकरे यांनी राऊत आणि चंद्रहार यांच्या आग्रहाची दिशा लक्षात घेतली आणि महाविकास आघाडीचे मिटण्याआधीच चंद्रहार यांच्या उमेदवारीची घोषणा केली. आता आघाडीचे कसे मिटणार ?, हा प्रश्‍न बाकी आहे. चंद्रहार लढणार, हे नक्कीच झाले आहे, मात्र त्यासमवेतच काँग्रेस ठाकरेंना शह देण्यासाठी मैत्रीपूर्ण लढत करू शकते. अशावेळी ठाकरेंची आणि चंद्रहार पाटील यांची कोंडी होऊ शकते.