सांगली समाचार - दि. ११ मार्च २०२४
नवी दिल्ली : बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीची गणिते फसल्यामुळे भाजपला आता महाराष्ट्रावर अधिकाधिक अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे भाजप महायुतीतील शिंदे व पवार गटासोबत जागावाटपासंदर्भात कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही. जिंकण्याची क्षमता या एकाच निकषावर जागावाटप केला जाईल, असा स्पष्ट संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत दिल्याचे समजते.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये ३७० जागांचा आकडा पार करायचा आहे. त्यामुळे जिंकेल त्याला उमेदवारी या सूत्रानुसार भाजपने पहिल्या यादीतील उमेदवारांची घोषणा केली होती. सोमवारी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी आघाड्यांच्या राज्यातील भाजपचे उमेदवार घोषित केले जाणार आहेत. भाजपसाठी दुसरी यादी सर्वात महत्त्वाची मानली जात असून इथेही जिंकण्याचे सूत्रच अवलंबले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे गट व अजित पवार यांना अधिक जागा पदरात पाडून घ्यायच्या असतील तर त्यांच्या उमेदवारांची जिंकण्याची खात्री भाजपला द्यावी लागेल. जिंकण्याची शाश्वती नसेल तर भाजपकडून दोन्ही गटांना त्यांच्या मागणीइतक्या जागा दिल्या जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भाजपकडून ३२ ते ३६ जागा लढवल्या जाऊ शकतात तर, शिवसेनेच्या शिंदे गटाला ८-१० तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ६-८ जागा दिल्या जाऊ शकतात. शुक्रवारी शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अडीच तास झालेल्या बैठकीमध्ये शिंदे गटाने १३ तर, अजित पवार गटाने दहा जागांची मागणी केल्याचे समजते. मात्र, भाजप महायुतीतील मित्र पक्षांची मागणी मान्य करून जिंकण्याच्या क्षमतेबाबत तडजोड करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची शहांशी दोनवेळा बैठक होऊनही जागावाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. पुढील दोन दिवसांमध्ये दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे व अजित पवार यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार जिंकून येतील याची खात्री भाजपला द्यावी लागेल. अन्यथा भाजपने देऊ केलेल्या जागांवर समाधान मानावे लागेल.
हेही वाचा – छत्तीसगडमधील दारूण पराभवानंतर आता भाजपाच्या बालेकिल्ल्यातच थेट दोन हात करण्याचे आव्हान, काय करणार भूपेश बघेल?
बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल (सं) कमकुवत होत असून त्याचा मोठा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिंदे व पवार गटाला अधिक जागा देऊन बिहारप्रमाणे इथेही पायावर दगड पडू नये, याची दक्षता भाजपला घ्यावी लागत आहे. त्यामुळे भाजप शिंदे व पवार गटांना अधिक जागा द्यायला तयार नसल्याचे सांगितले जात आहे.