Sangli Samachar

The Janshakti News

"जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही"; ओमर अब्दुल्ला ओकली गरळ



सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
जम्मू - महाराष्ट्र सरकारनं नुकतेच जम्मू काश्मीर इथं महाराष्ट्र भवन उभारण्याला मंजुरी दिली आहे. जम्मू काश्मीरात महाराष्ट्र भवन बांधणारे महाराष्ट्र असं पहिलं राज्य आहे ज्यांनी जम्मू इथं जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. श्रीनगरच्या बडगाम इथं अडीच एकरातील जागेवर हे भवन बांधण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्र भवनाच्या या निर्णयाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी विरोध केला आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना ओमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र भवनावर भाष्य केले. येत्या ऑक्टोबर महिन्यात आमचे सरकार राज्यात आल्यानंतर हे भवन बंद करू अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरात विधानसभा निवडणुका जिंकण्याचा निर्धार ओमर अब्दुल्ला यांनी केला. त्यावेळी काश्मीर खोऱ्यातील बडगाम येथे बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनवर त्यांनी टीका केली. या महाराष्ट्र भवनामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचा रोजगार हिसकावला जाईल असं त्यांनी म्हटलं. 


सध्या काश्मीरात मोठमोठ्या इमारती बांधल्या जात आहेत. विशेषत: पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या बनवल्या जातायेत. महाराष्ट्र भवनाचा वापर पर्यटकांसाठी केला जाणार आहे. हे ते पर्यटक असतील जे सध्या आमच्या हॉटेल्समध्ये राहतात. स्थानिक हॉटेल व्यावसायिकांची उपजीविका तुम्ही हिसकावून घेताय. सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत तुमचं सुरू राहू द्या. आमचे सरकार येताच आम्ही भवनाकडे बघू असा इशारा ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीर प्रशासनाला दिला आहे. कुलगाम येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. 

काश्मीर खोऱ्यात इतर राज्याचे भवन असलेले महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे. त्यासाठी शासनाने श्रीनगरच्या बडगाम इथं अडीच एकर जागा खरेदी केली आहे. श्रीनगर एअरपोर्ट नजीक ही जागा आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाने महाराष्ट्र सरकारशी हा व्यवहार केला आहे. या महाराष्ट्र भवनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटक आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आरामदायी निवास उपलब्ध करून देवून पर्यटकाला चालना देण्याचा हेतू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू काश्मीरला भेट दिल्यानंतर याठिकाणी जमीन खरेदी आणि पर्यटकांसाठी सुविधा देण्याची प्रक्रिया सुरु झाली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

जे भक्त अमरनाथ यात्रेला जातात, यात्रेकरूंसाठी मी स्वत: तिकडच्या राज्यपालांना विनंती केली. या राज्यात महाराष्ट्र भवन हवं, ही मागणी त्यांनी मान्य केली. ओमर अब्दुल्ला म्हणतात, मी महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही. हा द्वेष उबाठा गटाला मान्य आहे का? जे लोक महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही असं बोलतात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, हे किती लांच्छनास्पद आहे. दुर्दैवी आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत बसणाऱ्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.