yuva MAharashtra पक्षाला योग्य जागा न मिळाल्यास सहकारी साथ सोडतील; शिंदे-अजित पवारांची वाढली काळजी

पक्षाला योग्य जागा न मिळाल्यास सहकारी साथ सोडतील; शिंदे-अजित पवारांची वाढली काळजी



सांगली समाचार - दि. १० मार्च २०२४
मुंबई - दिल्लीत शुक्रवारी रात्री अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागावाटपाबाबात बैठक पार पडली, पण राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटला नाही. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये आणखी एक बैठक होऊन जागावाटपावर मतैक्य करण्याचा प्रयत्न होणार आहे. तूर्तास जागावाटपात किरकोळ जागा मिळाल्या तर पक्ष संघटनेत नाराजी पसरून अनेक नेते घरवापसी करतील, अशी भिती मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला वाटू लागले आहे. या कारणामुळे दोन्ही नेत्यांची काळजी आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

मुंबईमध्ये नुकतीच महायुतीच्या जागावाटपावर एक बैटक झाली होती. पण त्यात कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामूळे दिल्लीत शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठकसुध्दा निष्फळ ठरली. यामुळे हे नेते पुन्हा एकदा चर्चेच्या टेबलावर बसून जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.


२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपने २५ जागा लढवल्या होत्या. त्यात त्यांचा सर्वाधिक २३ जागांवर विजय झाला होता. त्यामुळे भाजपला यावेळी सर्वाधिक ३२ ते ३५ जागा हव्या आहेत. यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकेरी आकड्याच्या मोजक्या जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे या दोन्ही नेत्यांची चिंता आता वाढली असल्याचं दिसत आहे.