सांगली - अपुरा पाऊस, ऊन्हाचा तडाका आणि कृष्णा कोरडी अशा भयानक संकटाने सांगली जिल्हा दुष्काळात होरपळून निघतोय. जनावरांना चारा नाही, शेतीला पाणी नाही पिण्यासाठी शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध नाही. या प्रश्नामुळे सांगली जिल्ह्य़ातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेचे हालहाल होत आहेत. जिल्हा प्रशासनाला या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी व तातडीने शेती व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु झाली पाहिजे म्हणून माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसतर्फे सोमवार दि. ११ मार्च रोजी सांगली कलेक्टर ऑफिसवर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत व शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे.
दि. ११ मार्च २०२४ रोजी सकाळी ९.०० वा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून विश्रामबाग चौक येथून आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचा प्रारंभ होईल.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे -
म्हैसाळ, आरफळ, टेंभू व ताकारी पाणी योजनांचे उन्हाळी आवर्तन सुरू करुन त्यात सातत्य ठेवावे. चालू लोकसंख्या गृहीत धरून जिल्ह्यात दुष्काळी भागात मुबलक पाणी पुरवठा आवश्यक तेवढ्या टँकरद्वारे करावा. ढाणेवाडीची पाणी पुरवठा योजना व शेतीसाठी पाणी पुरवठा करावा. पलूस तालुक्यात कृष्णा कालव्याचे आवर्तन सुरू करणे व आरफळ योजनेतून तात्काळ पाणी मिळावे.
जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ व जेथे चारा टंचाई निर्माण झाली आहे अशा ठिकाणी मुक्या जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. म्हैसाळ योजनेचे आवर्तन बिनशर्त ठेवावे, विस्तापित म्हैसाळ योजनेचे काम युध्दपातळीवर पूर्ण करावे, सांगली महापालिका क्षेत्रात शुध्द व मुबलक पाणी पुरवठा करावा, कृष्णा नदी पावसाळ्यापर्यंत वहाती ठेवावी व पाणी उपसा बंदी लागू करु नये.
आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील, सांगली ग्रामीणचे अध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री पाटील, जिल्हा ग्रामीण व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य,जिल्ह्यातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील. शुध्द व मुबलक पाणी आपल्या हक्काचे आहे. या न्याय हक्कासाठी काँग्रेसने रस्त्यावर उतरून धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात नागरिकांनी संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमदार डॉ. विक्रमसिंह सावंत व पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे