सांगली समाचार - दि. १४ मार्च २०२४
आयोध्या - श्रीरामजन्मभूमी मंदिर न्यासाने आता भक्तांसाठी नवी नियमावली घोषित केली आहे. श्रीराममंदिरात प्रतिदिन एक ते दीड लाख लोक दर्शनासाठी येत आहेत. त्या अनुषंगाने ही नियमावली सिद्ध करण्यात आली आहे, असे रामजन्मभूमी न्यासातर्फे सांगण्यात आले आहे.
१. मंदिर सकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत भक्तांसाठी खुले रहाणार आहे.
२. मंदिरात प्रवेश केल्यापासून दर्शन करून बाहेर पडेपर्यंतची प्रक्रिया अत्यंत सहज सोपी करण्यात आली आहे. भक्तांना ६० ते ७५ मिनिटांत (एक ते सवा घंट्यात) प्रभु श्रीरामाचे दर्शन घेता येईल.
३. भक्तांनी मंदिरात प्रवेश करण्याआधी त्यांचेकडील भ्रमणभाष संच, चप्पल, पर्स इत्यादी महत्त्वाच्या वस्तू मंदिराबाहेरच्या परिसरात ठेवाव्यात, जेणेकरून त्यांचे दर्शन सुलभपणे होईल.
४. मंदिरात फुले, हार, प्रसाद आदी घेऊन येऊ नये.
५. पहाटे ४ वाजता श्रीरामलल्लाची मंगलाआरती, सकाळी ६.१५ वाजता श्रृंगार आरती आणि रात्री १० वाजता शयन आरती होईल. या तिन्ही आरत्यांना उपस्थित राहायचे असल्यास प्रवेशपत्र आवश्यक आहे. इतर आरत्यांना प्रवेशपत्र अनिवार्य नाही.
६. या प्रवेश पत्रासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही, तसेच प्रवेशपत्र श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असणार आहे. त्यामध्ये भक्ताचे नाव, वय, आधारकार्ड क्रमांक, भ्रमणभाष क्रमांक आणि शहराचे नाव असणे आवश्यक आहे.
७. श्रीराममंदिरात श्रीरामललाच्या दर्शनासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही किंवा विशेष प्रवेश पत्रही दिले जात नाही. त्यामुळे श्रीरामभक्तांनी 'सशुल्क दर्शन देतो' अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये.
८. मंदिरात येणार्या वृद्ध आणि दिव्यांग भक्तांसाठी 'व्हिलचेअर' म्हणजेच चाकाच्या खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या खुर्चीसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही.