yuva MAharashtra घटस्फोट का होत आहेत? मोटिव्हेशनल स्पीकर सिस्टर शिवानी यांनी सांगितले कारण

घटस्फोट का होत आहेत? मोटिव्हेशनल स्पीकर सिस्टर शिवानी यांनी सांगितले कारण



सांगली समाचार - दि. ३० मार्च २०२४
मुंबई -  आजकाल नातेसंबंध जितक्या लवकर जुळतात तितक्या लवकर तुटताना देखील दिसून येत आहेत. पूर्वीच्या काळात विवाहबंधन म्हणजे सात जन्माची गाठ समजली जायची, मात्र आता सात महिन्यांतच पती आणि पत्नीमध्ये वादविवाद पाहायला मिळतात, हे वादविवाद इतक्या टोकाला जातात की नाते तुटते.

आजही भारतात घटस्फोट ही संकल्पना मुलींच्या आईवडीलांसाठी क्लेशदायी आहे. असे असले तरी, शहरात घटस्फोट घेणे ही आता सामान्य गोष्ट बनली आहे. एखादे नाते कागदीपत्राद्वारे तोडणे सोपे जरी असले, तरी याचा मानसिक आघात संपूर्ण कुटुंबावर देखील पडू शकतो. आजकाल वाढत चाललेल्या या घटस्फोटाबद्दल मोटिव्हेशनल स्पीकर सिस्टर शिवानी यांनी आपले मत मांडले आहे. त्या म्हणतात, घटस्फोटामागील कारण म्हणजे एक छोटीशी चूक, जी पुढे मोठी होऊन घटस्फोटाचे मुख्य कारण बनते.


मोटिव्हेशनल स्पीकर सिस्टर बीके शिवानी यांचे विचार अनेकांसाठी फायदेशीर आहे. त्या नेहमी विविध विषयावर आपले मत मांडून समाज विकासाचा प्रयत्न करत असतात. त्यांचे व्हिडिओ आजच्या तरुणपिढीला खूप काही बोध देऊन जातात. अशाच एका व्हिडिओद्वारे त्यांनी समाजात वाढत असलेल्या घटस्फोटाबद्दल आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. त्या म्हणतात, " एखादे नाते तयार व्हायला वर्षं लागते पण ते तुटायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे प्रत्येक नाते चांगले जपले पाहिजे. काही नाती हृदयाच्या इतकी जवळची असतात की आयुष्यभर ते सोबत राहतात. पती-पत्नीचे नातेही असेच आहे, ज्यामध्ये वाद-विवाद होत राहतात पण नाते घट्ट होत जाते. पण काही कारणांमुळे पती-पत्नीमधील हे घट्ट नातेदेखील तुटते."

नाते तुटण्याचे नेमके कारण काय?
सिस्टर शिवानी म्हणतात की, 'आजच्या काळात ज्यांना वेगळे व्हायचे आहे अशा जोडप्यांना भेटून तुम्ही घटस्फोट का घेत आहात हे विचारून पहा? 5-10 वर्षांपूर्वी घटस्फोटा घेण्याचे ठोस कारण सांगितले जायचे, पण आज घटस्फोट घेण्याचे कारण लोकं काय सांगतात माहीत आहे का? लोकं म्हणतात 'नथिंग'. "

सिस्टर शिवानी पुढे म्हणतात की. "घटस्फोट घेणारी जोडपे बोलतात की, आम्हाला या नात्यामध्ये काहीही मिळत नाही, म्हणून आम्ही वेगळे होत आहे. पण जर तुम्ही हा विचार करत असाल कि तुम्हाला या नात्यामधून काही मिळणार नाही, तर तुम्ही या नात्यात पहिलेच का अडकला?"

सिस्टर शिवानी यांच्या मते, जर तुम्ही फक्त नात्यात फक्त देत असाल तर तुमच्या मनात हा विचार कधीच येणार नाही. त्यांमुळे जर कोणसोबत नातेसंबंध बनवत असाल तर आधी ठरवा की मला फक्त द्यायचे आहे. कोणीतरी आपल्याला काहीतरी देईल या आशेने हात पसरून कोणाच्या समोर कधीच जाऊ नये, नात्यांमध्ये असे कधीच होत नाही. तुम्ही जर समोरच्याकडून काही मिळण्याची अपेक्षा करत असाल तर लग्नाची पहिली काही वर्षं चांगली जातात, मात्र त्यानंतर नाते नकोसे होऊ लागते. म्हणून, नेहमी देणारे व्हा, घेणारे नाही.