Sangli Samachar

The Janshakti News

मुलाच्या लग्नात भेटवस्तू नको, पण मोदींना मतदान करा; वराच्या वडिलांची अनोखी मागणी



सांगली समाचार दि. २६ मार्च २०२४
हैदराबाद - निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र या सगळ्यात एक लग्नपत्रिका चर्चेत आली आहे. हैद्रराबादमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या मुलाच्या लग्नपत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा छापला असून आपल्या नातेवाईकांना आवाहन केले आहे की, लग्नात भेटवस्तू आणू नका, पण मोदींना मतदान करा. 
नंदीकांती नरसिम्लू असे मोदींचा चाहता असणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याच्या पत्नीचे नाव नंदीकांती निर्मला आहे. 

हैद्राबादच्या संगारेड्डी जिल्ह्यात राहणाऱ्या या व्यक्तीच्या मुलाचे 4 एप्रिल रोजी लग्न होणार आहे. साई कुमार असे त्या व्यक्तीच्या मुलाचे नाव असून त्याच्या लग्नानिमित्त छापलेली पत्रिका चर्चेचा विषय ठरत आहे. नंदीकांती नरसिम्लू यांना आपल्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेवर मोदींचा फोटा छापला असून नातेवाईकांना आवाहन केले आहे की, तुम्ही माझ्या मुलाच्या लग्नात भेटवस्तू आणू नका, पण नरेंद्र मोदींसाठी तुमचे एक मत आमच्यासाठी सर्वोत्तम भेट ठरेल, असे लिहिले आहे. सध्या या लग्नपत्रिकेची चर्चा हैद्राबादमध्ये होताना दिसत आहे.

नंदीकांती निरसम्लू हा घरं बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडी सामानांचा पुरवठादार आहे. याआधी त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाले. मात्र, त्याने त्यावेळी असे कोणतेही आवाहन केले नव्हते. मात्र माध्यमातील वृत्तानुसार नंदीकांती निरसम्लू यांनी त्यांच्या कुटुंबाला यासंदर्भात कल्पना दिली आणि त्यांना ती खूप आवडली. निमंत्रण पत्रिका पाहून लोक काही क्षण आश्चर्यचकित होत आहेत, तर सोशल मीडियावर या पत्रिकेची खूप चर्चा होत आहे. काही इंटरनेट वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर या पत्रिकेला अनोखी कल्पनाही म्हटले आहे.