yuva MAharashtra शहाजीबापूंविरोधात त्यांचे नऊ पुतणे 'तुतारी' वाजवणार?

शहाजीबापूंविरोधात त्यांचे नऊ पुतणे 'तुतारी' वाजवणार?



सांगली समाचार - दि. २५ मार्च २०२४
सांगोला  - महाराष्ट्राच्या राजकारणाला काका विरुद्ध पुतण्या राजकारणाचं एक वलय आहे. काका-विरुद्ध पुतण्या संघर्षांचं राजकारण महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिलं आहे. काकांविरोधात बंड पुकारलेल्या पुतण्यांनी काकांचा शिरस्ता मोडत राजकारणाचा वेगळा मार्ग चोखाळल्याची अनेक उदाहरणे राज्याला नवीन नाही. आता महाराष्ट्रात अजून एक असेच उदाहरण समोर आले आहे. विशेष म्हणजे एक दोन नाही तर तब्बल नऊ पुतण्यांनी आपल्या आमदार काकांविरुद्ध बंड पुकारले आहे.

काय झाडी-काय डोंगर फेम शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील यांच्यासह त्यांचे सख्खे चुलत बंधू असे एकूण नऊ बंधूंनी आपले काका शहाजीबापूंविरोधात बंड पुकारुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. शहाजीबापूंच्या नऊ पुतण्यांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारल्याने आता याची जोरदार चर्चा होत आहे.


ज्येष्ठ नेते पवारांची भेट घ्यायला गेलेल्या शहाजीबापू पाटलांचे पुतणे संग्रामसिंह पाटील म्हणाले, "पूर्ण काकांचा ग्रुपच शरद पवार गटात जाणार आहे. आम्ही नऊ पुतणे शरद पवार गटात जात आहोत. आमचे काकासु्दधा येतील अशी अपेक्षा आहे. गुवाहाटीला जाऊन मतदान मिळत नाही. मतदान पवार साहेबांच्या पाठीमागे आहे. आम्ही शहाजीबापूंचे एकूण नऊ जण पुतणे आहोत. आम्ही नऊ जण प्रवेश करणार आहोत.

शहाजीबापूंचे सख्खे पुतणे संग्रामसिंह पाटील यांनी मोदी बागेत जाऊन पवारांची भेट घेतली आहे. त्यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर शहाजी पाटील यांच्यासाठी धक्का मानला जाईल. कारण, शहाजी पाटील यांना घरातूनच आव्हान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घरात पडलेली फूट शहाजी पाटील यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.