Sangli Samachar

The Janshakti News

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; महाराष्ट्र-गुजरातमधील उमेदवारांची होणार घोषणा



सांगली समाचार - दि. ११ मार्च २०२४
नवी दिल्ली  - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. पहिली यादी जाहीर केल्यानंतर, भाजपने आता दुसऱ्या यादीची तयारी सुरू केली आहे. आज  सोमवार दि.११ सायंकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, त्यात गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणातील उर्वरित लोकसभा जागांबाबत चर्चा होईल. त्यानंतर लगेच पक्षाची दुसरी यादी जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक 

गुजरात-महाराष्ट्र आणि तेलंगणामधील लोकसभा उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या कोअर ग्रुपची गेल्या तीन दिवसांपासून बैठक सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरा जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीतील भाजप मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजपचे प्रमुख सी.आर. पाटील, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह तेलंगणातील भाजप नेत्यांचा समावेश होता.


आंध्र प्रदेशात टीडीपीसोबत निवडणूक लढवणार
दक्षिण काबीज करण्यासाठी भाजपने आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि पवन कल्याणच्या जनसेनेशी युती केरुन जागावाटपही पक्के केले आहे. भाजप आंध्रमध्ये लोकसभेच्या 8 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर उर्वरित जागा टीडीपी लढवेल.

यापूर्वी 2 मार्च रोजी भाजपने 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 34 मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपच्या पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, केरळमधील 12, तेलंगणातील 9, आसाममधील 11, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 8, जम्मू-काश्मीरच्या 5, उत्तराखंडच्या 3, अरुणाचलच्या 2, गोव्याच्या 1, त्रिपुराच्या 1, अंदमानच्या 1, दमण आणि दीवच्या 1 जागेचा समावेश आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 28 महिला, 27 एसटी, 18 एसटी, 57 ओबीसी आणि 47 युवा नेत्यांचा समावेश आहे.