yuva MAharashtra गडकरींऐवजी दुसरा उमेदवार ? भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांतून नाराजी

गडकरींऐवजी दुसरा उमेदवार ? भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांतून नाराजी



सांगली समाचार - दि. ४ मार्च २०२४
नागपूर - नागपूर म्हटलं की नितीन गडकरी आणि नितीन गडकरी म्हटलं की भाजप हे समीकरण गेले कित्येक वर्ष राजकारणात टिकून आहे. गडकरी यांनी केलेले कार्य आकाशाच्या उंचीचे आहे. तरीही भाजपने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांमध्ये नितीन गडकरी यांचे नाव नसल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.
अशातच भाजपच्या लोकसभा निरीक्षकांनी नागपूरमध्ये नितीन गडकरी हवेत की दुसरा उमेदवार हवा? अशी विचारणा स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना केली. त्यामुळे भाजपचा वेगळा सुरू आहे का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्याबरोबर नितीन गडकरींचं नाव असेल, असे म्हटले जात होते. पण, तसे घडलेले नाही. इतर नेत्यांची नावे आहेत, मात्र गडकरींच्या नावाचा समावेश नसल्याचे पाहुन गडकरीप्रेमीकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गडकरी हवेत की दुसरा उमेदवार?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मतदारसंघनिहाय लोकसभा निरीक्षक नियुक्त केले आहेत. खासदार मनोज कोटक आणि माजी आमदार अमर साबळे यांच्याकडे नितीन गडकरींच्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे. ते मतदारसंघात जाऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत आहे. सोबतच उमेदवारांविषयी मत जाणून घेत आहेत. निरीक्षक खासदार मनोज कोटक आणि माजी आमदार अमर साबळे नागपूरमध्ये होते. त्यांनी मतदारसंघातील पक्षाच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. 


भाजपची निवडणुकीची तयारी, उमेदवाराविषयी मत, विजयाच्या शक्यतेसह इतर माहिती जाणून घेतली. यावेळी निरीक्षकांनी 'नितीन गडकरी उमेदवार हवे की दुसरे', अशी विचारणा केली.  हा प्रश्न अनेकांना रुचला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून गडकरी यांची कामगिरी संपूर्ण देशाला ठावूक आहे. त्यांचा संपर्क, जनाधार, समाजकार्य, विकासकामे याविषयी विरोधकांनाही शंका नाही. त्यामुळे हा प्रश्‍नच नागपूरमध्ये उपस्थित होत नाही, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भाजपने केंद्रीय मंत्र्यांची कापली तिकीटं

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना भाजपने पक्षाच्या अनेकांना धक्का दिला आहे. माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली, केंद्रीय राज्यमंत्री जॉन बारला यांची तिकीटं कापली आहे. काही खासदारांचाही पत्ता कट केला आहे. त्यामुळे गडकरींच्या बाबतीत भाजपच्या मनात काय आहे, हे महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.