सांगली समाचार - दि. १० मार्च २०२४
पंढरपूर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते कामाला लागले आहेत. भाजपकडून अजूनही उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. अशात सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोण रिंगणात असणार याबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा आहेत. असे असतानाच भाजप नेते तथा राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी सोलापूर लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत. पक्षाने आदेश दिल्यास सोलापूर काय कोठूनही लढण्यास तयार असल्याचे खाडे म्हणाले आहेत. शनिवारी पंढरपूर येथे भारतीय मजदूर संघाच्या 24 व्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी ते आले असता बोलत होते.
यावेळी बोलतांना खाडे म्हणाले की, "मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून, पक्षाने आदेश दिल्यास सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले आहे. आम्हाला पक्षाचा आदेश कायम शिरसावंध असतो. अजून पक्षाकडून मला विचारणा झाली नसली, तरी सोलापूर राखीव काय मला सांगेल त्या लोकसभा मतदारसंघात मी लढायला तयार असल्याचेही" खाडे म्हणाले.
राखीव जागेवर अनुसूचित जातीच्या उमेदवारालाच तिकीट द्यावे
पुढे बोलतांना खडे म्हणाले की, "पहिल्यांदा मी जतमधून मोठ्या मताधिक्याने जिंकलो होतो. यानंतर पक्षाने गेल्या निवडणुकीत मला मिरज येथून निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आणि मी तेथून विजयी झालो. आताही पक्षाकडून आपल्याला जो काही आदेश दिला जाईल, तो आपल्यास मान्य असेल. सांगली लोकसभा मतदारसंघात शक्यतो बाहेरचा उमेदवार नको असा निर्णय झाला असून, विशाल पाटील यांच्या पक्ष प्रवेशाबाबत आपणास काही माहित नाही. कोल्हापूरची जागा असो अथवा देशातील कोणतीही जागा असो यंदा भाजप व मित्रपक्ष चारशे पार जाणार असा विश्वास खाडे यांनी व्यक्त केला. राखीव जागेवर अनुसूचित जातीच्या उमेदवारालाच तिकीट द्यावे, बोगस दाखले असणाऱ्यांचा विचार होऊ नये असे मतही सुरेश खाडे यांनी व्यक्त केले.
भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार
पुढील दोन-तीन दिवसांत भाजपकडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, याचवेळी भाजपकडून अनेक विद्यमान खासदारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपकडून यंदा डझनभर विद्यामान खासदारांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन नावांची देखील घोषणा केली जाऊ शकते. अशात या यादीत सुरेश खाडे यांना संधी मिळणार का हे पाहणं देखील महत्वाचे असणार आहे. सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी धोक्यात असल्याने सोलापूरच्या अडून सुरेश भाऊंनी सांगली वर दावा सांगितला आहे की काय अशी चर्चा सांगली मतदारसंघात रंगलेली आहे.