सांगली समाचार - दि. १८ मार्च २०२४
धाराशिव - लोकसभेची धामधुम सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनी आपआपले जाहीरनामे जाहीर करत आहेत. उमेदवारी ज्यांना जाहीर झाली आहे, ते देखील जाहीरनामा सादर करत आहेत. परंतु जनतेला काय हवे, हे कोणी जाणून घेत नाही. हाच विचार करून अपक्ष आमदार सत्यजीत तांबे जनतेचा आवाज सांगणारा जाहीरनामा बनवत आहेत. हा उपक्रम लवकरच ते सुरू करत असल्याची माहिती आमदार तांबेंनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.
महाराष्ट्रात 2024 हे वर्षे निवडणुकांचे आहे. देशातील लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. लोकसभा निवडणुकांचा बिगूल कालच वाजला. निवडणुकांना समोरे जाताना राजकीय पक्ष, त्यातील गट किंवा उमेदवार हा स्वतःचा अजेंडा जाहीरनाम्यातून जनतेसमोर मांडतात. राजकीय पक्षाची विचारधारा, हेतू, विचार, धोरणे आणि कार्यक्रम यांची जाहीरनाम्यात घोषणा असते.
जाहीरनाम्यामध्ये साधारणपणे आगामी निवडणुकांवर लक्ष ठेवून राजकीय पक्षांद्वारे मसुदा तयार केला जातो. देश, राज्य आणि लोकांसाठीची धोरणात्मक कार्यक्रम सादर केलेला असतो. राजकीय पक्षांचा जाहीरनामा म्हणजे सामान्य जनतेसाठी 'बेंचमार्क' असतो. राजकीय पक्षांच्या विचारधारा, धोरणे आणि कार्यक्रम यांची तुलना करून मतदार कोणत्या पक्षाला मतदान करायचे हे ठरतो.
देश स्वातंत्र्यानंतर 1952 सालापासून निवडणूका सुरु झाल्या. सुरूवातीला राजकीय पक्ष जाहीरनामे प्रसिद्ध करत नव्हते. परंतु अलीकडच्या काळात सर्वच राजकीय पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. या जाहीरनाम्यांमध्ये राजकीय पक्षांच्या मूलभूत विचारसरणी व्यतिरिक्त, प्रमुख धोरणांचा समावेश असतो. विविध सामाजिक उपाययोजन असतात. कृषी धोरण असते. परराष्ट्रासह शैक्षणिक, आरोग्य, मुलभूत सेवा धोरणांचा समावेश केला जात आहे.
राजकीय पक्ष, गटांचे जाहीरनाम्यांबरोबर संबंधित पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार देखील स्वतःचा जाहीरनामा तयार करतात. यामध्ये बहुतांशी भौगोलिक परिस्थितीचे प्रतिबिंब उमटलेले असते. यातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होता. हे झाले, राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या जाहिरनाम्यांचे! जनतेच्या काय?, असा प्रश्न करत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी जनतेचा आवाज सांगणारा जाहिरनामा बनवूया, अशी हाक दिली आहे.
आमदार तांबे म्हणाले, "ही संकल्पना साधी आणि सोपी असली, तरी ती जनतेसाठी खूप महत्त्वाची आहे. ही निवडूक जनतेसह देशासाठी खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा किंवा संबंधित उमेदवाराचा निवडणुकीला समोरे जाताना एक अजेंडा ठरलेला असतो. तसा तो जाहीर देखील करतो. राजकीय पक्ष किंवा लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधीत्व म्हणून काम करताना जनतेच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात. या अपेक्षा काही मोठ्या नसतात. पण जनतेला खूप महत्त्वाच्या वाटतात. याकडेच या उपक्रमाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधत आहोत. निवडून देणाऱ्या खासदारांकडून जनतेला काही अपेक्षा आहेत. जनतेला त्यांच्या अपेक्षा बिनधास्तपणे मांडण्यासाठी हे व्यासपीठ खुले असणार आहे".
हे व्यासपीठ संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी असणार आहे. 24 मार्चपासून जनतेचा जाहीरनामा करण्यासाठी कॅम्पेन सुरू होईल. जनतेने प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर त्याचे जाहिरनाम्यात रुपांतर करून एक मे रोजी खासदारकी लढवणाऱ्या उमेदवारांना देण्यात येणार आहे. यानंतर निवडून आलेल्या खासदारांकडून जनतेनेच जबाबदारीने काम करू घ्यायचे आहे, असेही आमदार तांबे यांनी म्हटले.
निवडणुकीच्या राजकारणात पारदर्शकता हे माझं पहिल्यापासून तत्व राहिल्याचे सांगून भारतासह जगभरातील 64 देशांमध्ये 2024 मध्ये संसदेच्या निवडणुका होत असल्याकडे आमदार सत्यजीत तांबे यांनी लक्ष वेधले. जगातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास 49 टक्के लोक मतदान करणार आहेत. जगात इतक्या मोठ्या प्रमाणात लोकशाहीचा उत्सव पार पडतोय. या उत्सवात आपण सर्वजण सहभागी होऊया, आपल्या देशाच्या विकासासाठी मतदान करू या, असे आवाहन आमदार तांबे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केले.