yuva MAharashtra शिंदे, फडणवीसांचा उल्लेख, अजित पवारांना निवडणूक चाणक्य विसरले... की ?...

शिंदे, फडणवीसांचा उल्लेख, अजित पवारांना निवडणूक चाणक्य विसरले... की ?...



सांगली समाचार - दि. ६ मार्च २०२४
जळगाव - लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. देशभरातील प्रमुख राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजपने आघाडी घेत १९५ उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली आहे. मात्र या १९५ उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश करण्यात आला नाही. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असून यांमध्ये अद्याप जागावाटपाबाबत एकमत झालं नसल्याचेच यामुळे अधोरेखित झाले आहे. अशातच मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे निवडणूक चाणक्य अशी ओळख असलेले अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी रात्री ते मुंबई येथे लोकसभा निवडणुकांमधील जागावाटपाबाबत चर्चा करणार आहेत.


मुंबई येथील बैठकीपूर्वी जळगाव येथे शहा यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये बोलताना त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विरोधकांना केवळ आपलं कुटुंब पुढं न्यायचं असून यासाठीच ते एकत्र आले असल्याची टीका शहा यांनी यावेळी पुन्हा एकदा केली. अमित शहा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर देखील भाष्य केले. महाविकास आघाडीचा उल्लेख त्यांनी तिन्ही चाकं पंक्चर असलेली रिक्षा असा केला. महाविकास आघाडीची तिन्ही चाकं पंक्चर असल्याचं म्हणत अमित शहा यांनी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट व बडे नेते पक्ष सोडत असल्याने काँग्रेसला पडत असलेलं खिंडार याकडे बोट दाखवलं. यावेळी अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सक्षम सरकारचं महाराष्ट्राचा विकास करू शकतं असा दावा देखील केला. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा उल्लेख करणाऱ्या अमित शहा यांना यावेळी सरकारमधील आणखी एक उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नावाचा मात्र विसर पडला.

केंद्रीय मंत्री अमित शहा हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठीच ते महाराष्ट्रात आले असल्याची चर्चा आहे. मात्र अशातच जाहीर सभेमध्ये बोलताना अमित शहा यांनी सरकारबाबत बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमित शहा यांना अजित पवार यांच्या नावाचा विसर पडला की भाजपचे निवडणूक चाणक्य काही वेगळा विचार करत आहेत का ? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.