Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत गुरुवारपासून द्राक्ष महोत्सव, शासनासह द्राक्ष बागायतदार संघाचा पुढाकार



सांगली समाचार दि. ६ मार्च २०२४
सांगली - नागरिकांना चांगल्या प्रतीचे द्राक्ष मिळावेत आणि द्राक्ष फळासंबंधी ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, या प्रमुख हेतूने गुरुवार दि. ७ ते शुक्रवार दि. ८ मार्च या कालावधीत सांगलीतील कच्छी जैन भवन येथे द्राक्ष महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवासाठी द्राक्ष बागायतदार संघ, राज्य शासनाचा कृषी विभाग, रासायनिक खते व कीटकनाशक उत्पादन घेणाऱ्या कंपन्या, बेदाणा व्यापारी असोसिएशन आणि बाजार समितीने पुढाकार घेतला आहे.

द्राक्ष महोत्सव तयारीसाठी कृषी विभागात बैठक झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सुरेंद्र पाटील, द्राक्ष संघाचे सचिव तुकाराम शेळके, सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, कृषी निविष्ठा उद्योजक संजीव कोल्हार, दीपक राजमाने, प्रतीक शहा, रवींद्र मुडे, समीर इनामदार, अविनाश माळी, सदाशिव लांडगे, यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


द्राक्षामुळे आरोग्यासाठीचे फायदे यासंबंधी लोकांमध्ये माहिती पोहोचावी यासाठी राममंदिर चौकातील कच्छी भवनात द्राक्ष महोत्सव होणार आहे. द्राक्ष महोत्सवाच्या निमित्ताने 'महाशिवरात्र द्राक्ष दिन' म्हणून देशभरात दरवर्षी साजरा व्हावा आणि या दिवशी प्रत्येक घरोघरी आवडीने द्राक्षे आणि बेदाणे खाल्ले जावेत. ज्यामुळे द्राक्ष फळांची मागणी वाढून दरामध्ये वाढ व्हावी व शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा हा द्राक्ष महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. महाशिवरात्रीला द्राक्षे खाल्ली जावीत हा संदेश सर्व देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न आहे, असेही रवींद्र मुंडे यांनी सांगितले.

मागणी देशभरात वाढेल

'महाशिवरात्र द्राक्ष दिन' संपूर्ण भारतभर भविष्यात साजरा झाला, तर द्राक्ष आणि बेदाणा फळाची मागणी वाढणार आहे. त्यामुळे द्राक्ष बागाईतदारांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल व त्यावर अवलंबून असणारे सर्व कृषी संलग्न व्यवसायांना भरभराटीचे दिवस येतील हा उद्देश आहे. ग्राहकांच्या सोबत 'द्राक्ष महोत्सव' साजरा करूया यासाठी सर्वांच्या उपस्थितीची व सहकार्याची आवश्यकता आहे, असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.