सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्हींना आल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान आहे. वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्हीचे आपले विशेष महत्त्व आहे तसेच नियम सुद्धा आहेत. या नियमांचे पालन केल्यास तसेच योग्य काळजी घेतल्यास अनेक प्रकारच्या समस्या दूर टाळता येऊ शकतात. दोन्ही शास्त्रांमध्ये आयुष्यातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. पण वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात या संदर्भात अधिक...
वास्तूशास्त्र म्हणजे काय ?
हिंदू धर्मात सर्वात प्राचीन शास्त्रांपैकी एक म्हणजे वास्तूशास्त्र आहे. वास्तूशास्त्रात दिशांना खूप महत्त्व दिले जाते. घर, इमारत बांधताना वास्तूशास्त्राचा विचार केला जातो. याला इंग्रजीत आर्किटेक्चर म्हणून सुद्धा संबोधले जाते. आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी कशा आणि कुठे असायला हव्यात याबाबत वास्तूशास्त्रात सांगण्यात येते. वस्तू या शब्दापासूनच वास्तू निर्मिती झाली. असे मानले जाते की, जेव्हा एखाद्या घराचे बांधकाम किंवा डिझाईन करण्याचं प्लानिंग होते तेव्हा वास्तूच्या तत्त्वांचे पालन केले जाते. यामुळे त्या मनुष्याच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते अशी मान्यता आहे.
ज्योतिषशास्त्र म्हणजे काय ?
सूर्य, ग्रह आणि काळ यांची माहिती देणारे शास्त्र म्हणजेच ज्योतिष शास्त्र आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रह, नक्षत्रांचे रूप, संचार, परिभ्रमण कालावधी, ग्रहण आणि स्थिती यांच्याशी संबंधित घटनांचे एकत्रित तपासणी करुन शुभ-अशुभ परिणाम निश्चित केले जातात. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून व्यक्तीच्या भविष्यात घडणाऱ्या घटना जाणून घेता येतात. याशिवाय मनुष्याच्या आयुष्यात कोणते अडथळे येऊ शकतात याचाही अंदाज वर्तवला जाऊ शकतो. ज्योतिषशास्त्राचा विज्ञानासोबतही संबंध आहे.
वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांच्यात काय आहे फरक ?
ज्योतिषशास्त्र हे एक वेदांग आहे. तर वास्तूशास्त्र हे अथर्ववेदातील एक उपवेद, स्थापत्य वेदावर आधारित आहे. ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या जन्मकुंडलीचा प्रत्यक्ष अभ्यास केला जातो. तर वास्तूशास्त्रात इमारतीच्या रचनेचा व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होतो याचाही अभ्यास केला जातो. ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रातील मुख्य फरक म्हणजे ज्योतिषशास्त्र हे खगोलीय पिंडांची व्याख्या आणि मनुष्यावर त्याचा होणारा परिणाम याच्याशी संबंधित आहे. तर वास्तूशास्त्र हे संतुलन आणि सद्भाव आणण्यासाठी घरांच्या डिझाईन, बांधकामात मदत करते.
वास्तू आणि ज्योतिष यांचा काही संबंध आहे का ?
वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे दोन्हीही प्राचीन काळात विकसित झालेले शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्र हे एकमेकांसाठी पूरक आहेत. इतकेच नाही तर दोन्हीमध्ये फार जवळचा संबंध सुद्धा आहे. वास्तूशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक विकसित भाग आहे. वास्तूशास्त्र असो किंवा ज्योतिषशास्त्र असो दोन्हीमध्ये मनुष्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो.