Sangli Samachar

The Janshakti News

मोदी-शाहांना हाकलून देण्याची भाषा करणारे राज ठाकरे शाहांच्या घरी पायधूळ झाडणार



सांगली समाचार - दि. १९ मार्च २०२४
मुंबई - मोदी-शाहांचे तोंडभरून कौतुक करीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला अक्षरशः शिव्याशाप देऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या सभा गाजवल्या. त्यानंतर म्हणजे लोकसभेच्या 2019 या निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी 'पलटी' मारली आणि या निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडिओ'ची स्टाइल आणली. मोदी-शाहांची भाषणे, त्यातली आश्वासने भरसभेत लोकांपुढे दाखवून राज यांनी मोदी-शाह या जोडगोळीला राजकीय पटलावरून हाकलून देण्याची भाषा केली.

साहजिकच, या निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोजक्या सभा घेऊन, दोन्ही काँग्रेसला 'छुपी' मदत केल्याचे बोलले गेले. मात्र, राज यांचा मोदी-शाहांविरोधाचा हा मुद्दा तेव्हा कळीचा ठरला होता. या दोघांचे राजकारण संपवायला निघालेले राज हे आता पाच वर्षांनी भाजपच्या 'डबल इंजिन' सरकारला आपले आपले इंजिन जोडण्याच्या तयारीत आहेत. पाच वर्षांआधी मोदी-शाहांचा पाणउतारा करणारे राज आता दिल्लीत जाऊन शाहांच्या घराची पायरी चढणार आहेत, यावरून उलटसुलट चर्चा आहे.


मराज ठाकरेंचं दिल्लीत 'डील', भाजपसोबत जाणार, दोन जागा लढवणार?
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांची सर्वच भाषणे थेट मोदी-शाहांवर निशाणा साधणारी होती. मोदी-शाहांना राजकीय पटलावरून हाकलून देण्याप्रमाणेच मोदीमुक्त भारताचा नाराही दिला होता. भारताला 1947 मध्ये पहिलं, 1977 ला दुसरं आणि आता 2019 मध्ये तिसऱ्या स्वातंत्र्याची भारताला गरज आहे. मोदीमुक्त भारत करा,'' अशी तोफ ठाकरेंनी मुंबईत शिवाजी पार्कवरील मनसेच्या 2018 मधील 'पाडवा मेळाव्या'त डागली होती. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी मोदी-शाहांना राजकीय पटलावरून हाकलून देण्याची भाषा केली होती.

निवडणुकीच्या काळात 'लाव रे तो व्हिडिओ'मधून त्यांनी भाजपची झोप उडवली होती. मोदींच्या अनेक भाषणांच्या क्लिप दाखवत राज यांनी त्यांची अक्षरश: चिरफाड केली. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या, प्रचंड गर्दी जमवली, मोदी-शाहांसह राज्यातील फडणवीस सरकारवरही त्यांनी शेलक्या शब्दांत टीका केली. त्याला प्रतिसादही तुफान मिळाला. विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार मैदानात नव्हता. त्यामुळे त्यांच्या या सभा नेमक्या कुणासाठी, याचीही चर्चा रंगली होती.

निवडणुका झाल्या, निकाल आला आणि देशात दुसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आले. त्यानंतर काही दिवसांतच ठाकरेंना ईडीची नोटीस आली. कोहिनूर मिल प्रकरणात त्यांना चौकशीसाठी बोलावले गेले. 22 ऑगस्ट 2019 रोजी राज ठाकरेंची ईडीने कसून चौकशी केली. त्यावेळी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर मात्र राज ठाकरेंचा व्हिडिओ पुन्हा चाललाच नाही. राज्य व केंद्र सरकारवर ते अधूनमधून विविध मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडत असतात. पण त्यांचा सूर सध्या नरमाईचा असतो, हे स्पष्टपणे दिसते.

आज हेच राज ठाकरे अमित शाहांच्या दिल्लीतील घराची पायरी चढणार आहेत. पाच वर्षांत पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. मनसेचे इंजिन यार्डातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. राज ठाकरे आणि आमची हिंदुत्वाची भूमिका सारखीच असल्याचा दावा करत भाजपकडून त्यांना गोंजारले जात असून, एनडीएत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरेंनी 2019 मध्ये मोदी-शाहांवर केलेली टीका विसरून भाजपचे नेते त्यांना जवळ करू पाहत आहेत. आता ठाकरेही नव्या दमाने लोकसभेच्या मैदानात उतरून मोदी-शाहांच्या कौतुकाचे नवे 'व्हिडिओ' लावणार का, याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.