Sangli Samachar

The Janshakti News

राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं नेमकं काय ठरलं?



सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणूक  जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे देखील उपस्थित होते. राज ठाकरे दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला होता. दिल्लीतील अमित शाह यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत आल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चा होत्या. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली आहे. वांद्रे येथील हॉटेल ताज लँडस् एँडस येथे ही बैठक झाली आहे. या बैठकीत राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही हे स्पष्ट होईल.

महायुतीनं राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 45 लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचं धोरण ठेवलं आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नवा मित्र जोडला जात आहे. मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे , राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीचं महत्त्व वाढलेलं आहे. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेना विजयी झाली होती. या मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून मिलिंद देवरा यांना तयारी करण्यास सांगितलं गेलं होतं. आता हा मतदारसंघ राज ठाकरेंच्या मनसेकडे जाणार असल्यास शिंदेंची सहमती आवश्यक आहे.


मनसेसाठी आजची बैठक का महत्त्वाची ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीसाठी आजची बैठक महत्त्वाची आहे. मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबई आणि शिर्डी जागा मिळणार का याबाबत चर्चा सुरु होती. दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेवर शिवसेनेचे खासदार गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. यावेळी यापैकी नेमकी कोणती जागा मनसेला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरु असताना महायुतीतील महत्त्वाचे नेते अजित पवार मात्र उपस्थित नाहीत. महायुती लढत असलेल्या जागांपैकी भाजपनं दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीचं जागा वाटप मनसेची एंट्री झाल्यानंतर जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात महायुतीचा प्रचार, लोकसभा निवडणुकीची रणनीती यासंदर्भात चर्चा आजच्या बैठकीत होऊ शकते. राज ठाकरे महायुतीत आल्यास उद्धव ठाकरेंकडून होणाऱ्या हल्ल्यांना ते प्रत्युत्तर देऊ शकतात. याशिवाय महाविकास आघाडीतील इतर नेत्यांवर देखील ते आक्रमकपणे टीका करतील.