सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
निपाणी - पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी सीमा तपासणी नाका येथे बुधवारी मध्यरात्री खासगी लक्झरी बसने प्रवास करणाऱ्या लाकूड व्यापाऱ्याची १४ लाखाची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई निवडणूक आयोग आणि पोलीस विभागाने केली. गेल्या दोन दिवसात या सीमा तपासणी नाक्यावरील ही दुसरी कारवाई आहे. आतापर्यंत या सीमा तपासणी नाक्यावर १८ लाख रुपये जप्त केले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने निपाणीच्या सीमेवर पाच ठिकाणी सीमा तपासणी नाके उभारले आहेत. यामध्ये कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आनंद ट्रॅव्हल्स या खासगी लक्झरी बसमधून मूळभाग (ता. हासकोटी, जि. बंगळुर) येथील लाकूड व्यापारी निसार सुनसारी हे सातारा येथून या लक्झरी बसमधून १४ लाखाची रोखड घेऊन जात होते. सीमा तपासणी नाक्यावर बस आली असता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बसची कसून चौकशी केली. यावेळी सुनसारी यांच्याकडे मिळालेल्या रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे याबाबतची माहिती तालुका निवडणूक प्रशासनाला देत सदरची रक्कम जप्त करून न्यायालयाकडे सुपूर्द केली.
ही कारवाई तहसीलदार एम. एन. बळीगार, सीपीआय बी.एस. तळवार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी, सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील यांच्यासह हुन्नरगी ग्रा.प.चे विकास अधिकारी माळाप्पा दत्तवाडे, सिदनाळ ग्रा.प.चे ग्रामसहायक शिवानंद तेली यांच्यासह पथकाने केली.