Sangli Samachar

The Janshakti News

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन



सांगली समाचार - दि. १४ मार्च २०२४
मुंबई - भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे ऑनलाईन भूमिपूजन बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. 
मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जे. जे महाविद्यालयाचे संचालक राजीव मिश्रा, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, क्रीश्ना मंगेशकर व अधिकारी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असे संगीत महाविद्यालय देशात असावे या उद्देशाने राज्य शासनाने भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक अँड म्युझियम स्थापन करण्यास मान्यता दिली होती. आज या संगीत महाविद्यालयाचा भूमीपूजन सोहळा झाला. या कार्यक्रमादरम्यान, स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेच्या पोर्टलचा शुभारंभही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. संगीत क्षेत्रात नवे काही शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून संधी उपलब्ध होईल आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल.


सांताक्रूझ (पूर्व) येथे 7 हजार चौ.मीटर जागेवर हे महाविद्यालय साकारले जाणार असून याठिकाणी चारशे आसन व्यवस्थेचे सभागृह, 18 क्लास रुम, संग्रहालय आणि प्रदर्शन दालन, 200 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, 300 आसनी खुले सभागृह आणि शिक्षकांसाठी निवास व्यवस्था आदी सुविधा असणार आहेत.