yuva MAharashtra महायुतीत धुळवड, महाआघाडीला चकवा

महायुतीत धुळवड, महाआघाडीला चकवा



सांगली समाचार - दि.२५ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची तारीख तोंडावर आली असली तरी सत्ताधारी महायुतीत मतभेद, इशारे, प्रतिइशाऱ्यांची धुळवड सुरूच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला त्यांचे नेते चकवा देऊन आघाडीबाहेर पडू लागले आहेत. रविवारचा दिवस महायुतीसाठी विविध राजकीय घडामोडींचा ठरला. एकनाथ शिंदे गटाचे विजय शिवतारे यांच्या टीकेमुळे संतप्त झालेले राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. दुसरीकडे शिवतारे यांनीही बारामतीमधून निवडणूक लढण्यास ठाम असल्याचे सांगितले. कालपर्यंत महाविकास आघाडीसोबत असलेले महादेव जानकर यांनी रविवारी आघाडीला चकमा देत महायुतीसोबतच राहणार, असे सांगितले तर उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश करून आघाडीला धक्का दिला.

कडू महायुतीतून बाहेर पडणार?

अमरावती लोकसभा मतदार संघात प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार उभा करू आणि हा उमेदवार १ लाख मतांच्या फरकाने निवडून येईल, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केल्याने महायुतीतील विसंवाद पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे. दरम्यान कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी बोलावले आहे. अमरावतीत मैत्रिपूर्ण लढत होईल, असे सांगून तूर्तास आपण महायुतीतच असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे असले, तरी ते महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


शिवतारे १२ एप्रिलला अर्ज भरणार

एकनाथ शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी आज सासवड येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर बारामतीतून निवडणूक लढण्यावर आपण ठाम असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. १२ एप्रिल रोजी आम्ही प्रचाराला सुरुवात करत निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले. १ एप्रिलला माऊलींच्या पालखी तळावर मोठी सभा घेणार आहे. माझ्याकडे कोणताही पक्ष नाही, माझ्याकडे फक्त सर्वसामान्य जनता आहे. पाचही विधानसभा मतदारसंघात अशा सभा घेतल्या जातील. १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि या पाशवी शक्तीचे १२ वाजविणार, असे विजय शिवतारे यांनी जाहीर केले आहे.

तर महायुतीतून बाहेर पडू

एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांना आवरा, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा अन्यथा, आम्ही महायुतीतून बाहेर पडू, असा थेट इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीला दिला आहे.

पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात विजय शिवतारे सातत्याने टीका करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आजही त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. आता शिवतारेंची हकालपट्टी करा, एवढीच आमची मागणी आहे. जर निर्णय घेतला गेला नाही, तर आम्हालाही महायुतीमधून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

शिवतारे यांच्या भूमिकेमुळे राज्यभरातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. ज्याचा फटका शेवटी महायुतीच्या मतदानावर होईल. त्यामुळे शिंदे यांनी शिवतारे यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी आहे, असे उमेश पाटील म्हणाले.

काँग्रेस आमदार पारवे शिवसेनेत

मी काँग्रेससोबतच राहणार, भाजप नेते व उपमुख्यमंत्री यांच्याशी झालेली भेट विकास कामासाठी होती, असे सांगणारे काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसचा राजीनामा देत रविवारी मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पारवे यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना रामटेकची लोकसभेची उमेदवारी देण्याचा भाजपचा प्रयत्न होता. पण शिवसेनेने रामटेकवरचा दावा न सोडल्याने भाजपची अडचण झाली. त्यामुळे ऐनवेळी भाजपने पारवे यांना शिंदे गटात प्रवेश करण्याची सूचना केली व त्यांच्याकडून रामटेकची निवडणूक लढण्यास सांगितले.

जानकरांनी भूमिका बदलली

महाविकास आघाडीसोबत जाणार असे चित्र निर्माण करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेऊन आपण महायुतीतच राहणार असल्याचे जाहीर केले. जानकर यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. जानकर यांनी पवार यांच्याशी अनेक वेळा चर्चाही केली होती. मात्र रविवारी अचानक त्यांनी महाविकास आघाडीला चकमा देत फडणवीस व मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. जानकर यांच्यासाठी एक जागा सोडण्यात येणार आहे.