yuva MAharashtra बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य, दोस्तीत कुस्ती होणार?

बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य, दोस्तीत कुस्ती होणार?



सांगली समाचार - दि. १३ मार्च २०२४
मुंबई - प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी भाजप आणि मित्रपक्षांना मोठा इशारा दिला आहे. महायुतीकडून लोकसभेच्या जागावाटपाबाबत विचारणा होत नसल्याने बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. महायुतीकडून विचारणा झाली नाही तर बच्चू कडू लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे शेकडो उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत. बच्चू कडू यांनी तसा इशारा महायुतीला, विशेषत: भाजपला दिला आहे. “लोकसभेच्या दृष्टीने आम्ही महायुतीमध्ये आहोत की नाही? हा संभ्रमित करणारा प्रश्न आहे. आम्ही सध्या संभ्रमात आहोत. चर्चा झाली तर ठीक. नाहीतर आम्ही स्वतः समर्थ आहोत. आम्ही मैदानात उतरू. आम्ही प्रत्येक मतदारसंघात 2000 उमेदवार उतरवू. माझं मतदान कुठे गेलं? हे मला पाहायला मिळालं पाहीजे, असा मोठा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

“माझं एकच म्हणणं आहे, मी तो धंदा करत नाही आणि मी कधी विचारत नाही की माझं पहा. आमची भूमिका ठाम असते. आम्हाला विचारलं तर ठीक आहे. नाही विचारलं तर ठीक आहे. आम्ही आमच्या ठिकाणी स्वाभिमानी आहोत. कोणी कोणाचा पक्ष संपविण्याची कोणाची ताकद नसते. आमची गरज असते तेव्हा चार फोन केले जातात. विधान परिषदेची, राज्यसभेची निवडणूक असली तेव्हा फोन करून बच्चू निघाला का? असं विचारलं जातं. हे मी 20 वर्षांपासून अनुभवतोय आणि नाक कसं दाबायचं आणि कोणत्या प्रश्नासाठी दाबायचं हे मला माहीत आहे”, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.


‘आमचे 2 हजार ते 3 हजार उमेदवार असतील’

“आम्ही स्पष्टपणा ठेवतो. आम्हाला कोणाची भीती नाही. कोणता नेता नाही ज्याच्यासमोर आम्ही झुकतो, असं मला वाटत नाही. त्यांनी चर्चा केली तर आम्ही चर्चा करू. आम्ही स्वतःहून चर्चा करू, एवढे आम्ही लहान नाही. आमचा पक्ष लहान असला तरी सगळ्यात मोठी लिस्ट आमच्या पक्षाच्या उमेदवारांची असेल. बाकीचे पक्ष 400 ते 500 उमेदवार उभे करतील. आमचे 2 हजार ते 3 हजार उमेदवार असतील”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

‘महायुती धर्म पाळणे हे त्यांचे काम नाही, तर तोडणे…’

“सध्या आम्हाला जागेची विचारणा झाली नाही. तर ‘मी खासदार मोहीम’ ही मोहीम राबवू. आमच्यासोबत बोलण्याची त्यांना गरज वाटतं नसेल. आम्ही कमी पडत असू म्हणून भाजप आमच्यासोबत चर्चा करत नाही. महायुती धर्म पाळणे हे त्यांचे काम नाही. तर तोडणे आमचे काम आहे”, असं मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. “भाजप जागावाटप लीड करत असल्याने त्यांची लहान पक्षाला विचारण्याची त्यांची जबाबदारी आहे. लहान पक्षांना अशी वागणूक देण्याचा भाजपचा इतिहास आहे”, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

‘भाजप आमच्यात आली, आम्ही त्यांच्यात नाही’

“महाविकास आघाडीने आमच्यासोबत चर्चा केली तर आम्ही तयार आहोत. भाजपने एक पाऊल समोर टाकावं. आम्ही 10 पावलं टाकू. माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे. 20 वर्षीच्या राजकीय आयुष्यात आमची मोठी बदनामी झाली. पण सरकारमध्ये कामे झाली. दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं, याचं समाधान झालं. सरकार स्थापन करण्यात आमचा सिंहाचा वाटा. आम्ही सरकार स्थापन केलं. भाजप आमच्यात आली. आम्ही त्यांच्यात नाही. आम्ही शिंदेंसोबत आहोत. भाजप सोबत नाही. लोक दीडशे रुपये खर्च करून 50 रुपयांची साडी घेऊन समधान व्यक्त करतात. हे आता लोकांनी ठरवायला पाहिजे”, असं मत बच्चू कडू यांनी मांडलं.

“बॅलेट पेपरवर निवडणूक झाली तर आम्ही जिंकलो, असं समजू. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रहारची भूमिका महत्त्वाची ठरली असं समजू . आमचा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांवर आहे. कापसाचा विषय घरकुलाचा विषय हा महत्त्वाचा आहे. आमचा बॅलेट आम्हाला पाहायला भेटला पाहिजे. हा अधिकार अबाधित राहिला पाहिजे ही मोहीम आम्ही राबवू”, असं बच्चू कडू म्हणाले.