सांगली समाचार - दि. ४ मार्च २०२४
मिरज - कधी कधी राजकीय वातावरण तापलं की इतर गोष्टींचाही उपयोग होतो, भाजपा हा अडचणीत आलेला पक्ष असल्याने सांगलीत काँग्रेसच विजयी होणार असा दावा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा सांगली लोकसभा संघातील महाआघाडीचे संभाव्य उमेदवार विशाल दादा पाटील यांनी केला आहे. मिरजेत अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी बोलताना विशाल दादा म्हणाले की, कोणाला निवडून आणायचं हे जनतेनं आधीच ठरवलेलं असतं. फुटबॉल स्पर्धा हे फक्त निमित्त आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात बदल होणार आणि तो नक्कीच होणार असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
भाजपा हा अडचणीत आलेला पक्ष आहे, त्यांना सांगलीत सक्षम उमेदवार मिळत नाही. यामुळेच कधी विशाल पाटील, कधी विश्वजीत कदम तर कधी प्रतीक जयंतराव पाटील यांचे नाव पुढे आणण्यात येत असते, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना विशाल पाटील यांनी म्हटले. 'वंचित' ने येथे चंद्रहार पाटील यांचे नाव निश्चित केल्याच्या प्रश्नावर विशाल पाटील म्हणाले की, असे अजून काहीही निश्चित ठरलेले नाही हा फक्त अंदाज आहे. वंचित आघाडी निश्चितपणे आमच्या सोबत येईल, आणि येथे डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी एकसंघपणे लढत देईल व काँग्रेसचाच उमेदवार निश्चितपणे यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मिरजेतील फुटबॉल स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्त्यांनी श्रम घेतलेले आहेत. आणि म्हणूनच या स्पर्धेत कुठल्याही पक्षाचे वापरले गेले नाही. फुटबॉल स्पर्धा ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये जात, धर्म, पक्ष या गोष्टी आडव्या येत नाहीत, असेही विशाल दादांनी म्हटले. वसंतदादांचे नाव आले की लोक पक्ष सोडून एकत्र येतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
वसंतदादा पाटील यांची ३५ वी पुण्यतिथी एक मार्चला असते. आणि या निमित्ताने प्रतिवर्षी एखादी स्पर्धा व्हावी, अशी इच्छा मिरजेतील सर्व लोकांनी इच्छा व्यक्त केली, तेव्हा आम्ही मिरजेतील सर्व पक्षीय नेत्याना विनंती केली. त्यानुसार शिवाजी दुर्वे यांनी पुढाकार घेऊन या स्पर्धेचे नियोजन केले. त्यांना इतर सर्व नेत्यांनी मदत केली, म्हणूनच खूप वर्षानंतर अशी स्पर्धा होऊ शकली, आणि त्याचा मिरजकराने आनंद घेतला, असे प्रतिपादन विशाल दादांनी केले.