सांगली समाचार - दि. १४ मार्च २०२४
मुंबई - वडापाव खाल्ला नाही असा व्यक्ती किमान महाराष्ट्रात तरी आढळणं कठीण आहे. मुंबईतल्या व्यक्तीने तर वडापाव खालेल्ला नसणे म्हणजे दुर्मिळच. वडापाव भारतातील लोकप्रिय स्ट्रिट फूड आहेच, पण त्याची आता जागतिक पातळीवर देखील दखल घेण्यात आली आहे. आपला वडापाव भारी आहेच यावर जगानेच शिक्कामोर्तब केले आहे.
जगातील सर्वाधिक भारी ५० सँडविचेसच्या यादीमध्ये आपल्या मुंबईच्या वडापावने १९ वे स्थान मिळवले आहे. प्रसिद्ध फूड अँड ट्रव्हल गाईड TasteAtlas ने सर्वात प्रसिद्ध सँडविचेसची यादी जाहीर केलीये. यात वडापावला देखील स्थान आहे. त्यामुळे भारताच्या स्ट्रिट फूडसाठी ही एक मोठी घटना आहे. वडापावच्या लोकप्रियतेला आणि चविला एकप्रकारे मान्यताच मिळाली आहे. वड्यासोबत चटणी, सॉस आणि मिरची-कांदा दिल्यास वडापावच्या चवीला तोडच राहत नाही. स्वस्त आणि मस्त असलेला वडापाव सर्वसामान्यांच्या आवडीचा आहे. देशातील, राज्यातील विशेषत: मुंबईतील लोकांसाठी वडापाव हा आवडीचा पदार्थ आहे.
वडापावची सुरुवात कशी झाली
टेस्ट ॲटलासच्या दाव्यानुसार, वडापावची सुरुवात अशोक वैद्या यांनी केली होती. ते १९६० आणि १९७० च्या दशकात मुंबईतील रेल्वे स्टेशनवर वडापाव विकत होते. गरीब लोकांसाठी पोट भरण्यासाठी एक स्वस्त पदार्थ असावा असा त्यांचा विचार होता. त्यानंतर वडापाव मुंबईकडे सगळीकडे विकला जाऊ लागला. हळूहळू तो महाराष्ट्रात देखील पाहायला मिळू लागला. भारतातील काही शहरात देखील वडापाव मिळतो. मुंबईतील काही ठिकाणं वडापावसाठी प्रसिद्ध आहेत. टेस्ट ॲटलासकडून विविध देशांमधील ५० पदार्थांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात भारताच्या वडापावचा समावेश असणे मोठी गोष्ट आहे. टेस्ट ॲटलासकडून दरवर्षी अशा प्रकारची यादी जाहीर केली जाते.