Sangli Samachar

The Janshakti News

आजी-आजोबांनो तयार राहा! दहावी-बारावीला असलेल्या नातवंडानंतर आता तुमची परीक्षा



सांगली समाचार - दि. १५ मार्च २०२४
मुंबई : राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांनाही टेन्शन आलं आहे. पण आता या मुलांच्या आजी-आजोबांचीही परीक्षा होणार आहे. रविवारी 17 मार्चला ही परीक्षा होणार आहे.महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा कोणती आणि का होणार आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

केंद्र सरकारच्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी होणार आहे. रविवार 17 मार्च रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात ही परीक्षा होणार आहे. राज्यात आतापर्यंत 6 लाख 20 हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी केंद्रशासनाकडे झाली असून त्या सर्वांची परीक्षा घेण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. 5 लाखाहून अधिक नवसाक्षर ही परीक्षा देतील असा अंदाज आहे.

काय आहे उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम 

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन 2022 ते सन 2027 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. देशातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) आणि संख्याज्ञान विकसित करणं,असाक्षर व्यक्तींना महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करणं हा याचा उद्देश आहे. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी आणि जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण, इ. बाबींचा समावेश आहे.


महाराष्ट्राने 14 ऑक्टोबर 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ही योजना स्वीकारली आहे. त्यानुसार 25 जानेवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

कुठे होणार परीक्षा?

केंद्रशासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात उल्लास ॲपवर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या शाळेतून उल्लास ॲपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे, ती प्रत्येक शाळा परीक्षा केंद्र असणार आहे. त्यामुळे नजीकच्या केंद्रावरच परीक्षा देण्यासाठी जावं. नोंदणीकृत असाक्षरांनी रविवार दिनांक 17 मार्च 2024 रोजी त्या शाळेमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 05 या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी. तसेच सदर नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत असं आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी उल्लास ॲपवरील नोंदणीकृत असाक्षर व्यक्तीच परीक्षा देण्यास पात्र असेल. उल्लास ॲपवर ऑनलाईन नोंदणी केलेली नसल्यास परीक्षा देता येणार नाही.

परीक्षेला जाताना काय न्यावं?

परीक्षेस जाताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा एक आयकार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी न्यावा. (फोटोबाबतची सक्ती नाही.) जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीने स्वतःचं मतदान ओळखपत्र/ आधारकार्ड/पॅनकार्ड/ बँक पासबुक इत्यादीपैकी कोणतंही एक ओळखपत्र आणणं आवश्यक आहे, जेणेकरुन उत्तरपत्रिकेतील प्रथम पानावरील माहिती भरणं तसंच असाक्षर व्यक्तींचा परीक्षा
नोंदणी अर्ज भरणं शक्य होईल.

कशी असणार परीक्षा?

योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं की,परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होईल म्हणजे परीक्षार्थीस पेपरची हार्ड कॉपी देण्यात येईल. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकत्रित असेल. मराठी माध्यमातून परीक्षा असेल. अपवादत्मक परीक्षा केंद्रांवर इतर माध्यमांचे परीक्षार्थी आल्यास त्याबाबतची व्यवस्था जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे.

प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याच्याशी संबंधित एकूण 150 गुणांची आहे. भाग-क (वाचन) 50 गुण, भाग-ख (लेखन) 5o गुण, भाग-ग(संख्याज्ञान) 50 गुण, अशा तीन भागांमध्ये ती विभागलेली आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी 33 टक्के (17 गुण) अनिवार्य आहेत. एकूण 150 गुणांपैकी 33 टक्के (51 गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे 33 टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त 5 वाढीव गुण देता मिळू शकतील. परंतु तीनही भागाचे मिळून 5 पेक्षा जास्त ग्रेस गुण देता मिळणार नाहीत.

परीक्षेची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. या कालावदीत कधीही जाऊन तुम्ही परीक्षा देऊ शकता. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी 3 तासांचा असेल. दिव्यांग व्यक्तींसाठी 30 मिनिटं जादा वेळ असेल. उत्तरपत्रिकेतील माहिती आणि उत्तरं लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा. पेन्सिल अथवा इतर रंगाची शाई असलेला पेन वापरु नये, अशा सूचना आहेत.

कशासाठी आहे ही परीक्षा?

ही परीक्षा विहित निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्र/ गुणपत्रक देण्यात येणार आहे. या परीक्षेच्या माध्यामातून व्यक्तीमध्ये विविध जीवनकौशल्ये विकसित होतील. तसंच त्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तसंच दैनंदिन जीवन जगत असताना स्वतःच्या कुटुंबात,पाहुणे, नातेवाईक यांच्यामध्ये आपलं कौतुक होईल. वेगवेगळया दुकानांमध्ये वस्तुची खरेदी करणेसाठी गेले असता फसवणूक होणार नाही. बँक/ पोस्ट ऑफिस इ. ठिकाणी आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक होणार नाही.