सांगली समाचार - दि. ३ मार्च २०२४
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने यादीत मोठी चाणक्यनिती दाखवली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी 8 डाव खेळले आहेत, ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अनेक दिग्गज खासदारांचे तिकीट कट करण्यात आले आहे. भाजपने पहिल्या यादीतून सुरक्षित डाव खेळला आहे. यावेळी निवडणुकीत बहुतांश उमेदवारांची पुनरावृत्ती करण्याच्या मनस्थितीत भाजप नाही अनेक नविन नावे भाजपने दिले आहेत.
शिवराज सिंह चौहान-
मध्य प्रदेशात २४ उमेदवार उभे करण्यात आले आहेत. राज्यातील २९ पैकी २८ जागांवर भाजपचे उमेदवार आहेत. २९ पैकी २४ जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. पक्षाने केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना गुनामधून उमेदवारी दिली आहे. बीडी शर्मा यांना खजुराहोमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून तिकीट देण्यात आले आहे. शिवराज सिंह चौहान मध्यप्रदेशात मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते. मात्र भाजपने ऐनवेळी बाजी पलटवली आणि शिवराज सिंह चौहान यांना झटका देत मोहन यादव यांना मुख्यमंत्री केले. मात्र भाजपने शिवराज सिंह चौहान यांना केंद्रात घेतले आहे.
सध्या रमाकांत भार्गव विदिशा मतदारसंघातून खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शैलेंद्र पटेल यांचा पराभव केला. विदिशा ही जागा भाजपची सर्वात सुरक्षित जागा मानली जाते. या जागेवरून शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त केले. जनतेची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले.
विदिशा लोकसभा मतदारसंघाशी माझे खूप जवळचे नाते आहे, येथील जनतेने मला पाचवेळा खासदार म्हणून निवडून देऊन सेवा करण्याचा बहुमान दिला. पक्षाने पुन्हा एकदा याच कुटुंबाची सेवा करण्याची संधी दिली आहे. आदरणीय पंतप्रधान देशातील जनतेच्या हृदयात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप ४०० हून अधिक जागा मिळवून सरकार स्थापन करेल, असा विश्वास शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला.
हेमा मालिनी -
हेमा मालिनी यांना तिकीट मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र मथुरेतून हेमा मालिनी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत ३४ केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांचीही नावे आहेत.
राजधानी दिल्लीतून ५ जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीतील पाच जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. चार खासदारांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांचे तिकीट कट करण्यात आले आहे. त्यांच्या जागी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांना तिकीट देण्यात आले आहे.
प्रवीण खंडेलवाल -
दिल्लीत चांदणी चौकातून डॉक्टर हर्षवर्धन यांच्या जागी प्रविण खंडेलवाल यांना तिकीट देण्यात आले आहे.
प्रज्ञा ठाकूर यांचा पत्ता कट
सर्वाधिक चर्चा भोपाळच्या जागेची होती. येथून प्रज्ञा ठाकूर यांचे तिकीट रद्द करून आलोक शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे. प्रज्ञा ठाकूर या सध्या भोपाळमधून खासदार आहेत.
छत्तीसगडमध्ये ४ विद्यमान खासदारांची तिकिटे कापली, नव्या चेहऱ्यांना संधी
रायगडमधून राधेश्याम राठिया, सुरगुजामधून चिंतामणी महाराज, बिलासपूरमधून तोखान साहू, महासमुंद- रूप कुमारी चौधरी आणि रायपूरमधून ब्रिजमोहन अग्रवाल यांना संधी देण्यात आली आहे. रायपूरचे विद्यमान खासदार सुनील सोनी यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी ब्रिजमोहन अग्रवाल यांना तिकीट देण्यात आले आहे. विद्यमान खासदार चुन्नीलाल साहू यांचे तिकीट कापून महासमुंदमधून रूप कुमारी चौधरी यांना रिंगणात उतरवले आहे. याशिवाय जांजगीर चंपा येथील विद्यमान खासदार गुहाराम आजगळे यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात हारलेल्या जागांवर नवीन उमेदवार-
श्रावस्तीमधून नृपेंद्र मिश्रा यांचा मुलगा साकेत मिश्रा, आंबेडकर नगरमधून रितेश पांडे, जौनपूरमधून कृपाशंकर सिंह आणि नगीनामधून ओम कुमार यांना तिकीट देण्यात आले आहे. रितेश पांडे यांनी 25 फेब्रुवारी रोजी बसपमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. अवघ्या 5 दिवसांनंतर, 2019 मध्ये हरलेल्या जागेवरून भाजपने रितेशवर विश्वास व्यक्त केला आहे. 2019 मध्ये रितेशने भाजपचे उमेदवार मुकुट बिहारी वर्मा यांचा पराभव केला होता.
मुंबई काँग्रेसच्या माजी अध्यक्षाला भाजपने दिलं युपीमधून तिकीट-
कृपा शंकर सिंह उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने कृपाशंकर सिंह यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले आहे. कृपाशंकर सिंह महाराष्ट्राच्या काँग्रेस सरकारमध्ये गृहमंत्रीही राहिले आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह हे मुंबईतील कलिना येथील माजी आमदार आहेत.त्यांचे वडिलोपार्जित गाव जौनपूर आहे.
गुजरातच्या यादीत पाच नवे चेहरे -
गुजरातच्या यादीत पाच नवे चेहरे भाजपने दिले आहेत. यामध्ये, बनासकांठा मधून रेखाबेन हितेश चौधरी, अहमदाबाद पश्चिम येथे दिनेश मकवाना, पोरबंदरमध्ये मनसुख मांडविया, पंचमहालमध्ये राजपालसिंग महेंद्रसिंग जाधव तर राजकोट येथे परशोत्तम रुपाला यांना संधी देण्यात आली आहे.
भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत एससीचे २७, एसटीचे १८ आणि ओबीसीचे ५७ उमेदवार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमधून ५१, बंगालमधून २०, मध्यप्रदेशातून २४, गुजरातमधून १५, राजस्थानमधून १२, केरळमधून १२, तेलंगणातून ९, आसाममधून ११, झारखंडमधून ११, छत्तीसगडमधून ११ उमेदवारांना तिकीट मिळाले आहे. दिल्लीतून ५, जम्मू काश्मीर २, उत्तराखंड ३, गोवा १, त्रिपुरा १, अंदमान निकोबार १, दमण दीव 1 जागांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत.