yuva MAharashtra कारखान्यांच्या मद्य साठ्यावर सीसीटीव्हीचा वॉच, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

कारखान्यांच्या मद्य साठ्यावर सीसीटीव्हीचा वॉच, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश



सांगली समाचार  - दि. २० मार्च २०२४
सांगली - निवडणूक कालावधीमध्ये कोणताही गैरप्रकार आणि चुकीचा आर्थिक व्यवहार होऊ नये, यासाठी सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखान्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले पाहिजे. बँकांनी रोकड नेताना दक्ष राहावे, तसेच कारखान्यांनी मद्य साठ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कारखाना व्यवस्थापनाला दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सहकारी बँका, पतसंस्था व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सहकारी बँकांचे प्रतिनिधी, साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.


डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यातील बँकांनी व पतसंस्थांनी आचारसंहिता काळात बँकेची रोकड वाहतूक करताना काळजी घ्या. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. बँकांकडून रोकडची वाहतूक सुरू असते. मात्र, रोकड नेत असताना त्याबाबतचे लेखी पत्रही सोबत ठेवले पाहिजे. बँकांच्या गाड्यांचीही तपासणी केली जाऊ शकते. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत, याबाबतची दक्षता संबंधित बँकांनी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी आपल्या डिस्टिलरीच्या मद्य साठ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे आणि ते चोवीस तास चालू ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये दिरंगाई दिसून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नीता सावंत-शिंदे, जिल्हा अधीक्षक उत्पादन शुल्क प्रवीण पोटे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा परिषद मुख्य लेखा विठ्ठल चव्हाण आदी उपस्थित होते.

डिस्टिलरीवर असणार नजर : संदीप घुगे

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, साखर कारखाने त्यांच्या डिस्टिलरी युनिटमधून तयार होणाऱ्या मद्यावर उत्पादन शुल्क व पोलिस विभागांनी एकत्रित लक्ष ठेवावे. आचारसंहितेला कुठेही गालबोट लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केली. तर साखर कारखान्यांनी त्यांच्या मद्य साठ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत ठेवा, अशी सूचनाही त्यांनी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाला दिली.