मुंबई - DNA साखळीचा दूषित तुकडा बदलल्यास माणसाचा स्वभाव बदलणेही शक्यता निर्माण झाली आहे. असे एक संशोधन सध्या आकाराला येत आहे...
...या संशोधनाचं एक वेगळंच मूल्य आहे. आपल्या प्राक्तनात बदल करणं आता शक्य आहे, याची ग्वाही त्यानं दिली आहे. आज ती वनस्पतीसारख्या सजीवांपुरतीच मर्यादित राहिली आहे, पण ती प्राण्यांमध्येही वापरता येईल. एवढंच काय पण भविष्यात मानवाच्या जनुकीय वारशामध्ये इष्ट बदल करता येतील, अशी आशा निर्माण झाली आहे.
'नशीबच फुटकं त्याला काय करणार? सारे नशिबाचे भोग आहेत. त्यांच्यापासून सुटका नाही. प्राक्तन बरं, प्राक्तन! सटवाईनं जे लिहिलंय त्याला पर्याय नाही'... नशिबाला दोष देत, 'आलिया भोगासी असावे सादर' असं म्हणत निमूटपणे ते मान्य करण्याचा हा सर्वसाधारण समज आहे.
प्राक्तन म्हणजे काय? तर वाडवडिलांकडून मिळालेला जनुकीय वारसा. आपले यच्चयावत शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्म निर्धारित करणाऱ्या डीएनएच्या रेणूंचा समुच्चय. त्यात आता वर्तणुकीचं नियंत्रण करणारी जनुकंही असतात याचा शोध लागल्यामुळं ज्याला औषध नाही, अशा स्वभावाची गणनाही या नशिबाच्या करामतींमध्ये केली गेली आहे.
ही धारणा कालपरवापर्यंत योग्यही होती. सजीवाला मिळालेल्या जनुकाच्या वारशात कोणताही बदल करणं शक्य नव्हतं. त्यात जर काही दोष मुळातच असतील, तर त्यांचे परिणाम व्यक्त होतीलच. काही वेळा ही दूषित जनुकं सूप्त स्वरूपात असतात. एखादं बटण दाबल्यावर उपकरण काम करू लागावं, तशी ही जनुकं प्रकट स्वरूप धारण करण्यासाठी अशा एखाद्या कारकाची गरज भासे. पण त्यांना हटवणं किंवा त्यांचा नायनाट करणं शक्य नव्हतं.
पण डीएनएच्या साखळीचा असा दूषित तुकडा कापून टाकणाऱ्या रिस्ट्रिक्शन एन्झाइम नावाच्या रासायनिक कातऱ्यांचा शोध लागला आणि परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. आता तो तुकडा कापून टाकणं आणि त्या जागी हव्या असलेल्या एखादा लाभदायी तुकडा जोडून देणं शक्य झालं. एवढंच काय पण मुळातच त्या साखळीत नसलेल्या एखाद्या तुकड्याची जोड देत त्या सजीवाच्या अंगी वेगळीच क्षमता निर्माण करणंही शक्य झालं. यालाच जैवअभियांत्रिकीच्या युगाची नांदी म्हटली गेली.
त्याचीच प्रचिती अमेरिकेतल्या एका व्यावसायिक कंपनीनं आता दिली आहे. पेटुनिया हे घराची शोभा वाढवणारं एक फुलझाड. त्याची शुभ्र रंगाची फुलं मोहक असतात. दिवाणखान्याचं वातावरण प्रसन्न करतात. रात्रीच्या अंधारात ती दिसत नाहीत. पण आता ती अंधारात फिकट हिरव्या रंगाच्या दीप्तीनं उजळून निघत आहेत. झोप उडवण्याइतका प्रकाश त्यांच्या अंगी नाही. पण शेजारच्या टेबलावर ठेवलेल्या घड्याळातल्या वेळ दाखवणाऱ्या आकड्यांचा जेवढा प्रकाश असतो तेवढा ती निश्चितच देतात. अशी फुलं आता बाजारात आलेली आहेत.
ही किमया साकार झाली ती जैवअभियांत्रिकीच्या कल्पक वापरापायी. काजव्यांच्या अंगी अशी प्रकाशमान होण्याची नैसर्गिक क्षमता असते. तो त्यांच्या जनुकीय वारशाचा प्रभाव आहे. ती जनुकं अलग करून त्यांचा अंतर्भाव पेटुनियाच्या जनुकसंचयामध्ये केला गेला. ती जनुकं या नवीन सजीवामध्येही प्रकट होऊन आपला प्रभाव दाखवतील याची खातरजमा करून घेतली गेली. ही करामत साध्य करण्यासाठी या वैज्ञानिकांनी गेली पस्तीस वर्षं प्रयत्न केले आहेत. सुरुवातीला त्यांनी काजव्यांमधील ल्युसिफरेझ या प्रथिनाच्या निर्मितीस कारणीभूत असणाऱ्या जनुकांचा समावेश तंबाखूच्या एका जातीच्या रोपांमध्ये केला. तसं करण्यामागे जनुकांच्या प्रकटीकरणासाठी कोणत्या प्रक्रिया होतात यांचा वेध घेण्याचा उद्देश होता. पण त्याच प्रकारे पेटुनियासारख्या शोभिवंत फुलझाडांमध्ये करण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्याच्या कारणांचा शोध घेतला असता, त्या जनुकांच्या प्रकटीकरणासाठी विशिष्ट प्रकारचं अन्न आवश्यक असल्याचं दिसून आलं. ते पेटुनियासाठी योग्य नव्हतं. त्यासाठी पेटुनियामध्ये मुळातच कार्यरत असलेल्या एखाद्या रासायनिक प्रक्रियेचा उपयोग करता येईल का, असा विचार केला गेला. तशा एका प्रक्रियेचा शोधही लागला. तिचा उपयोग ल्युसिफरेझ जनुकाला काम करायला लावण्यासाठी त्यांनी काजव्यांच्या ऐवजी अंगभूत दीप्ती असणाऱ्या एका अळंबीकडे आपला मोर्चा वळवला. ती अळंबीही काजव्यांप्रमाणे स्वयंभूरित्या प्रकाशमान होते. त्यासाठी ती तिच्या अंगी असलेल्या कॅफिक आम्ल या रसायनाचा वापर करते. तिच्या माध्यमातून ती त्या प्रकाशदायी जनुकाला कार्यान्वित करते.
कॅफिक आम्ल हे काही वनस्पतींमध्येही कार्यरत असल्याचं समजल्यावर ते पेटुनियामध्येही आहे की काय याचा वेध घेतला गेला. पेटुनियालाही तो वारसा मिळाल्याचं स्पष्ट झाल्यावर त्या कॅफिक आम्लाचं ल्युसिफेरिन या प्रकाशमान रसायनात रूपांतर करणाऱ्या एन्झाइमचा शोध घेतला गेला. त्याची रुजवात पेटुनियामध्ये केली गेली. तिथं तर वैज्ञानिकांना एक लॉटरीच लागली. कारण ते एन्झाइम कॅफिक आम्लाचं ल्युसिफेरिनमध्ये रूपांतर तर करतच होतं, पण त्या रसायनानं आपला प्रकाश पसरल्यावर त्याची परत कॅफिक आम्लात परिणती होत होती. एक चक्राकार रासायनिक प्रक्रिया कार्यान्वित होत होती. त्यामुळं कोणत्याही विशिष्ट खाद्याची किंवा खास बटणाची आवश्यकता न भासता आता ते पेटुनिया सतत उजळत राहत होतं. दिवसा ते सूर्यप्रकाश शोषून घेत होतं आणि रात्री त्या साठवलेल्या प्रकाशानं स्वतःला उजळवून टाकत होतं. जर पेटुनियाची कुंडी दिवसा चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवली, तर पुढची प्रक्रिया पेटुनिया आत्मनिर्भरपणे करत राहील याची शाश्वती मिळाली होती. अर्थात त्यासाठी त्या ल्युसिफेरिनची मदत आवश्यक होतीच. तिची पूर्ती या जैवअभियंत्यांनी केली होती. त्याकरिताच त्या अळंबीतली जनुकं वेगळी करून त्यांचं रोपण पेटुनियामध्ये केलं गेलं आहे.
अशा प्रकारे वांग्यांसारख्या काही खाद्यवनस्पतींची जनुकसुधारित वाणंही तयार केली गेली आहेत. ती हानीकारक आहेत, असा दावा करून त्यांना काही समाजसेवी संस्थांकडून विरोध केला गेला आहे. त्यामुळं या पेटुनियापायीही असाच काही धोका आहे की काय अशी शंका घेतली गेली. खास करून याच सुमारास दुसऱ्या एका उद्योगसमूहानं जांभळ्या रंगाच्या टोमॅटोचं वाण विकसित करून ते बाजारात आणण्याचे प्रयत्न चालवले होते. खरंतर या जांभळ्या टोमॅटोमध्ये काही खास पोषणमूल्य नाही. पण काही तरी आगळंवेगळं करण्याची वृत्ती अशा टोमॅटोच्या विक्रीला हातभार लावत होती. तो खाद्यपदार्थ असल्यामुळं अर्थातच त्याच्या सेवनाचे कोणतेही अनिष्ट परिणाम होत नाहीत हे निर्धारित होणं आवश्यक होतंच. त्याच्यापायी जो बखेडा उत्पन्न झाला होता, त्याची कास धरत या पेटुनियाविरुद्धही आक्षेप घेतले गेले.
पण एक तर हे केवळ शोभिवंत फुलझाड आहे. त्याचा खाद्यपदार्थांमध्ये समावेश होत नाही. तरीही त्यातून जो प्रकाश बाहेर फेकला जातो त्याचा आसपास वावरणाऱ्या व्यक्तींवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता अजमावण्यासाठी प्रयोग केले गेले. त्यांच्या निष्कर्षातून ते निर्धोक असल्याचं सिद्ध झालं आहे. म्हणूनच अमेरिकेच्या अन्न औषधी नियंत्रकांनी त्याला बाजारात आणण्याचा परवाना दिला आहे. पण या संशोधनाचं एक वेगळंच मूल्य आहे. आपल्या प्राक्तनात बदल करणं आता शक्य आहे, याची ग्वाही त्यानं दिली आहे. आज ती वनस्पतीसारख्या सजीवांपुरतीच मर्यादित राहिली आहे, पण ती प्राण्यांमध्येही वापरता येईल. एवढंच काय पण भविष्यात मानवाच्या जनुकीय वारशामध्ये इष्ट बदल करता येतील, अशी आशा निर्माण झाली आहे. नशिबाचे भोग म्हणत त्यांचा मारा निमूटपणे सहन करण्याचं कारण उरणार नाही.