Sangli Samachar

The Janshakti News

इंडिया आघाडी म्हणजे फिल्टर कॉफी; खासदार शत्रुघ्न सिन्हा



सांगली समाचार - दि. २४ मार्च २०२४
नवी दिल्ली - विरोधकांची इंडिया आघाडी फिल्टर कॉफीप्रमाणे आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणखी नेते सामील होतील तेव्हा या कॉफीची चव आणखी वाढेल,'' असा दावा तृणमूल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे. 'इंडिया' आघाडीत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांच्यासारखे सक्षम नेते असून आणि यात अन्य मातब्बर नेते सामील होतील, असा दावा केला.

आसनसोलचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, '' लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला पाठिंबा वाढत आहे. भारत जोडो न्याय यात्रा क्रांतिकारी यात्रा होती. राहुल गांधी हे देशातील सक्षम नेते आहेत. निकालानंतर आमच्या पक्षाच्या नेत्यांचा निर्णय हा राजकारणाची दिशा बदलणारा असेल. पंतप्रधान कोण होईल, त्याचा निर्णय निकालानंतर विरोधी पक्षाचे नेते घेतील.'' निवडणूक रोखे हा एक मोठा गैरव्यवहार आणि वसुलीचा काळाबाजार असल्याचे ते म्हणाले.


''रोख्यांच्या रूपातून वसुली आणि ब्लॅकमेल करणाऱ्या भाजपच्या टोळीचा भंडाफोड करण्यासाठी सात टप्प्यांतील निवडणूक विरोधकांसाठी पर्वणी आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव केला जाईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे सीबीआय, ईडी, प्राप्तीकर खात्याचे पाठबळ असेल तर इंडिया आघाडीकडे जनतेचा पाठिंबा आहे. आमच्या आघाडीत कोणीही घटक पक्ष नसल्याचे अनेकांना वाटते, मात्र जनता हेच आमचे बलस्थान आहे. 'इंडिया'आघाडीची विविध भागात लोकप्रियता वाढत आहे'', असा दावा सिन्हा यांनी केला. शत्रुघ्न सिन्हा हे दुसऱ्यांदा आसनसोल मतदारसंघात निवडणूक लढत आहेत. २०२२ च्या पोटनिवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

स्थानिक परिस्थितीमुळे काही राज्यांत प्रत्यक्षात आघाडी होणे शक्य नाही. भाजप स्वबळावर ३७० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा आणि रालोआ ४०० आकडा पार करण्याचा दावा करत आहे. परंतु या प्रकारच्या दाव्यातून भाजपची हतबलता लक्षात येते. कर्नाटक आणि मध्यप्रदेशप्रमाणे घोडेबाजार केला तर भाजपला हा आकडा गाठणे शक्य आहे. अन्यथा भाजपला १५० ते १७५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. भाजपने मागील निवडणुकीत ३०३ जागा जिंकल्या होत्या.