सांगली समाचार- दि. १ मार्च २०२४
जालना - मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांना डिस्चार्ज मिळाला असून, जरांगे पुन्हा आंतरवाली सराटीला जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले. ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर ठाम असल्याचा इशारा दिला आहे. सोबतच पुढील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मराठा समाजाला काही महत्वाच्या सूचना देखील केल्या आहेत.
काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना जरांगे म्हणाले की, “आज मी रुग्णालयातून सुट्टी घेत आहे. आज आणि उद्या दोन दिवस मी आंतरवाली येथे राहणार आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी गावात धरणे आंदोलन करावे. मराठा समाजाला जर 10 टक्के आरक्षण दिले असेल, तर ओबीसीमधून आरक्षण देण्यास काय हरकत आहे. तसेच, 10 टक्के आरक्षण मान्य करा, अन्यथा गुंतवा असे षडयंत्र सुरु आहे. महाराष्ट्रात जे चाललय त्यावर पुढील काही दिवस बारकाईने लक्ष ठेवा. मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीबाबत गावागावात व्हॉट्सअप ग्रुप तयार करावे. कालपासून मराठ्यांनी तालुक्या तालुक्यात बैठका घेणे सुरू केले आहे. त्यामुळे मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
विद्यार्थ्यांसाठी आंदोलन स्थगित केले
पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “सर्व नियमात राहून आमचं आंदोलन सुरूच राहील. निवडणूक आयुक्त जे नियम आम्हा आंदोलकांना लावणार आहे, तेच नियम निवडणुकीसाठी लावावे. मी फक्त विद्यार्थ्यांसाठी आंदोलन स्थगित केले आहे. राज्यात कुठेही आमचं आंदोलन नाही. विद्यार्थीसाठी हे आंदोलन स्थगित केले असून, आडमुठापणा नाही, असेही जरांगे म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, पोलिसांनी संचारबंदी लावल्याने ते पुन्हा आंतरवालीत परतले होते. याचवेळी सतत 15 ते 16 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे महिलांच्या हस्ते आमरण उपोषण संपवून जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.