सांगली समाचार - दि. २२ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत सहभागी होण्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घटक पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वांद्र्यातील हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची बैठक झाली. जवळपास दीड तास तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय ठरलं हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र राज ठाकरे लवकरच भूमिका स्पष्ट करतील. महायुतीत सहभागी होण्यावरून चर्चा झाली असली तरी या बैठकीला घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित नव्हते.
राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीला अजित पवार यांच्या अनुपस्थितीची चर्चा सध्या होत आहे. अजित पवार या बैठकीला का नव्हते? मनसेला महायुतीत घेण्यासंदर्भात अजित पवार यांची भूमिका काय आहे? हे अस्पष्ट आहे. महायुतीत अजित पवार हे घटक पक्ष आहेत. पण या बैठकीत कुठेही अजित पवार दिसलेले नाहीत. त्यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे खेडसह बारामती परिसरात होते. त्यानंतर आज महायुतीसंदर्भात राज ठाकरेंची बैठक सुरू आहे. पण त्या बैठकीसाठी इतर तीन नेते उपस्थित असताना अजित पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे अजित दादा नेमके कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित होतोय.
महायुतीत मनसे सहभागी होणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अमित शहांसोबत बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंची बैठक झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित बैठक झाली. गेल्या तीन दिवसात वेगवान घडामोडी घडल्या असून महायुतीत सहभागी होण्यासाठी राज ठाकरे सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून मनसेकडून महायुतीत सहभागी होण्यासंदर्भात पावले टाकली जात आहे. मनसेच्या नेत्यांमध्येही महायुतीत सहभागी होण्यावरून संभ्रम आहे.