सांगली समाचार - दि. १३ मार्च २०२४
मंगळवेढा - कायम दुष्काळी असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांनी अलमट्टीच्या पाण्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट भेटीची वेळ दिल्याने या गावातील ग्रामस्थ 24 गाड्या घेऊन बंगळुरूकडे रवाना होणार आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ उडाली असून शिंदे फडणवीस सरकारसाठी हा धक्का मानला जातोय. गुरुवारी बंगळुरू येथे मुख्यमंत्री कार्यालयात या 24 गावातील प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडीचा फटका सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीवर होणार असून राज्यातही विरोधकांना प्रचारासाठी आयते कोलीत मिळणार आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर गेले अनेक वर्षे राजकारण सुरु असताना महाराष्ट्रातील या 24 गावांनी थेट कर्नाटकाला जोडण्याची मागणी केल्यावर राज्य सरकारला जाग येणे अपेक्षित होते. मात्र या 24 गावांनी ग्राम ठराव करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर या गावातील प्रतिनिधींनी दोन बैठक घेतल्यावरही शासनाने यांच्या मागणीची दखल न घेतल्याने या गावांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. यानंतर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी दुपारी 11 ते ३ यादरम्यान भेटीची वेळ दिल्याने या 24 गावातून सर्व प्रतिनिधी आणि ग्रामस्थ बुधवारी पहाटे बंगळुरूकडे निघणार आहेत.
मंगळवेढा तालुका हा कायमचा दुष्काळी तालुका असून येथे पिण्याच्या पाण्यासोबत शेतीलाही कधी पाणी मिळत नव्हते. यासाठी गेले 50 वर्षे केवळ या गावांच्या पाण्यावर राजकारण होऊन अनेक आमदार खासदार निवडून आले पण या गावांचा घास कोरडाच राहिला. यानंतर या गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना बनविण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांची सही देखील झाली असली तरी अद्याप या योजनेस निधीची तरतूद झाली नसल्याने लोकसभा आचारसंहितेपूर्वी निधीची घोषणा करण्याची या गावांची मागणी होती. निवडणूक प्रचारकाळ असो अथवा विधानसभा अधिवेशन असो, राज्यातील सर्वच नेत्यांनी या गावांना पाणी देण्याच्या घोषणा केल्या. मात्र या योजनेला निधी मिळू शकलेला नाही. उजनी धरणात असणाऱ्या अतिरिक्त 2 टीएमसी पाणी या गावांना उपसा करून देणारी ही योजना सध्या लालफितीत अडकल्याने याला निधीची घोषणा होऊ शकलेली नाही.
याउलट कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाचे पाणी मंगळवेढा तालुक्याच्या बॉर्डरवर आल्याने आम्हाला अलमट्टीच्या पाण्याची शाश्वती वाटते अशी भूमिका या गावांनी घेतली आहे. कर्नाटक सीमेपासून अगदी कमी अंतराचे कॅनॉल काढून या 24 गावांचा पाण्याचा प्रश्न हातोहात सुटू शकणार असल्याने या गावांनी आता जगण्यासाठी कर्नाटक बरे अशी ठाम भूमिका घेतली आहे. गुरुवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय आश्वासन देतात त्यावर या 24 गावांचा निर्णय अवलंबून असणार आहे. बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी गेले अनेकवर्षे सीमावादावर बोलणारे मोठमोठे नेते आणि सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील या कायम दुष्काळी गावांचा प्रश्न सोडविण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आता या गावांचा संयम सुटला आणि महाराष्ट्र पाणी देणारच नसेल तर जगण्यासाठी कर्नाटकात जाऊ ही भूमिका घेऊन हे ग्रामस्थ कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. अजूनही आचारसंहिता लागली नसली तरी राज्य सरकारने या योजनेस किमान निधी जाहीर केला तर या गावांचे कर्नाटकात सामील होणे थांबू शकणार आहे. अन्यथा ही राज्यातील शिंदे-भाजप सरकारवर मोठी नामुष्कीची वेळ ठरेल.