सांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
शिर्डी - शिर्डीच्या साईबाबांना म्हटलं एक सुंदर मूर्ती डोळ्यासमोर येते. या मूर्ती समोर दररोज लाखो भाविक लीन होत असतात . साईबाबांचे भक्त केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आढळून येतात. किंबहुना ते जगभर पसरलेले आहेत. आणि म्हणूनच शिर्डी येथे दानपेटी पुसून वाहत असते.
परंतु याच शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीबाबत एक धक्कादायक सत्य समोर येत आहे. भविष्यात या मूर्तीचे सुंदरता कमी होण्याचा धोका तज्ञांनी व्यक्त केला आहे. साईबाबांची ही मूर्ती अगदी सजीव. परंतु हळूहळू या मूर्तीची झीज होत आहे. या मूर्तीचे काळजी न घेतल्यास भविष्यात ही मूर्ती गुळगुळीत होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. या मूर्तीसाठी इटालियन मार्बलचा वापर करण्यात आला आहे. बाळाजी तालीम यांनी ही सुंदर मूर्ती बनवलेली आहे. बाबांच्या 35 वर्षानंतर म्हणजे 1954 साली या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
साईबाबांच्या मूर्तीकडे बारकाईने पाहिले तर, तज्ञांच्या म्हणण्याला दुजोरा मिळतो. 1954 सालच मूर्ती आजची असलेली मूर्ती यामध्ये नखे, दाढीचे केस झिजलेले आढळतात. साई जीवन चरित्राचे अभ्यासक प्रमोद आहेर यांनी याबाबत बोलताना सांगितले की, कोणतीही मूर्ती असली तरी तिचे एक आयुष्य असते. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा दररोजच्या मूर्तीवर केल्या जाणाऱ्या अभिषेकामुळे, मूर्तीवर परिणाम होत असतो. मूर्तीचे सौंदर्य कमी होत असते.
या पार्श्वभूमीवर मूर्तीचे थ्रीडी स्कॅनिंग करून मूर्तीचा डाटा संरक्षित करता येऊ शकतो. भविष्यात मूर्तीचे सौंदर्य अधिकच बिघडले आणि नवीन मूर्ती तयार करायची झाली तर हा डाटा उपयोगी पडू शकतो, आणि अगदी हुबेहून मूर्ती बनवता येऊ शकते, असे मूर्ती तज्ञ प्रशांत बंगाळ यांनी सांगितले आहे. बंगाळ म्हणाले की, तिचे रूप बदलले तर पुढील पिढीला हुबेहूब मूर्तीचे दर्शन घेता येऊ शकते. यासाठी या मूर्तीचा डेटा सेव्ह असला पाहिजे, तो सुरक्षित असला पाहिजे.
मूर्तीची झीज होण्याची कारण म्हणजे, ज्या इटालियन मार्बल पासून ही मूर्ती बनवलेली आहे ते नैसर्गिक दृष्ट्या अतिशय थंड असते. मूर्तीला दही दुधाचा अभिषेक केला जातो, त्यातील आम्लाचा मूर्तीवर विपरित होतो. मूर्ती गरम पाण्याने धुण्यात येत असल्यामुळे, त्याचाही परिणाम होतो. लाखो करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मूर्तीचे संवर्धन होण्यासाठी मंदिर ट्रस्ट कडून विशेष काळजी घेण्याची गरज तज्ञांनी व साई भक्तांनी व्यक्त केलेली आहे.